ठरलं, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचीच सभा
शिंदे गट अर्ज मागे घेणार
मुंबई (रिपोर्टर): शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरवर्षी होणार्या दसरा मेळाव्याबाबत गेल्यावर्षी पेच निर्माण झाला होता. यंदा देखील पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली होती, पण अखेर हा पेच निकाली निघाला आहे. कारण शिंदे गटाचे आमदार आपला अर्ज मागे घेणार आहेत, त्यामुळं ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोणाचा? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरचा आपला दावा सोडला आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटानं शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सदा सरवणकर स्वतः मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा प्रत्येक शिवसैनिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नवचैतन्य जागवणारा असतो. पण शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर इतर अनेक मुद्द्यांप्रमाणेच दसरा मेळाव्यावरुनही वादावादी झाली. गेल्या वर्षी दसरा मेळाव्याचा वाद हायकोर्टापर्यंत गेला होता. यंदाही दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज करत दावा केला होता. पण, आता शिंदे गटानं याबाबत एक पाऊल मागे येत, शिवाजी पार्कऐवजी इतर मैदानांच्या पर्यायाचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचा यंदाचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, आपण इतर मैदानांची चाचपणी करतोय, त्यामुळे शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी सदा सरवणकरांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. आता स्वतः सदा सरवणकच हा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.