बीड (रिपोर्टर) दोन महिन्यानंतर शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या आशीर्वाद कॉलनीतील नाल्या उपसण्यात आल्या, त्याची घाण रस्त्याच्या कडेला टाकली मात्र याला आठ दिवस लोटले तरीही ती घाण उचलली नाही. त्यामुळे रस्त्यावर गटार साचले आणि पुन्हा नाल्या तुंबल्या. त्यामुळे आशीर्वाद कॉलनीत संपुर्ण घाणीचे साम्राज्य पसरले. या नाल्या साफ करून घाण उचलून नेण्याची मागणी होत आहे.
शहरातील सांगली बँकेच्या पाठिमागे असलेल्या आशीर्वाद कॉलनीतील नाल्या गेल्या दोन महिने उपसल्या नव्हत्या. आठ दिवसांपूर्वी या नाल्यातील घाण उपसून ती रस्त्याच्या कडेला टाकली. याला आठ दिवस लोटले तरी देखील ती घाण नगरपालिकेने उचलून नेली नाही. काल झालेल्या पावसात ती घाण पुन्हा नालीत गेली तर रस्त्यावरही पुर्ण घाण पाणी साचले आहे. आशीर्वाद कॉलनीच्या समोर असलेले काही व्यापारी दुकानातील सर्व कचरा नालीत टाकत असल्याने नाल्या तुंबतात त्यामुळे आशीर्वाद कॉलनीत घाण पाणी साचते. नगरपालिका प्रशासनाने नाल्यात कचरा टाकणार्या व्यापार्यांवर कारवाई करून कॉलनीतील नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी नागरिकातून होत आहे.