वेबसाईट अजूनही हँगच; हजारो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडकले
बीड (रिपोर्टर) इयत्ता 10 वी आणि बारावीचे निकाल लागून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. मात्र प्रवेश घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना जातीचे आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र लागतात. मात्र ज्या महाऑनलाईन वेबसाईटद्वारे हे प्रमाणपत्र काढण्यात येते तीच वेबसाईट पंधरा दिवसांपासून जाम झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडकलेले आहेत.
महाऑनलाईन वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रेमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्नाचे प्रमाणपत्र शैक्षणिक प्रवेशासाठी अत्यावश्यक आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल लागून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपआपले प्रमाणपत्र काढण्यासाठी महाऑनलाईन वेबसाईटला जातात तेव्हा ही वेबसाईट जाम असल्यामुळे प्रमाणपत्र निघत नाहीत. विद्यार्थी आणि पालक वेबसाईट आज खुली होईल उद्या होईल म्हणून दररोज चकरा मारतात मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. प्रवेशाची तारीख निघून जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. या महाऑनलाईन सेतू केंद्राचे नियंत्रण राज्य सरकारकडे मुंबईस्थित असल्याने जिल्हा पातळीवर कोणतेच कार्यालय याला जबाबदार नाहीत. त्यामुळे याचे गार्हाणे कोणाकडे मांडायचे अशा पेचप्रसंगात विद्यार्थी पालक अडकला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी तात्काळ या महाऑनलाईन सेतु केंद्राचे नियंत्रकाशी बोलून वेबसाईट सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांतून होत आहे.