गेवराई/दिंद्रुड (रिपोर्टर): चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटेगाव येथील बुथ क्र. 49, 50 च्या आवारात गोंधळ घालणार्या अज्ञात पाच ते सहा लोकांविरोधात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इकडे दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बाभळगाव येथे मतदान केंद्राच्या शंभर मिटर अंतराच्या आत गाडी उभा करणार्या सुनील यादवराव निकाळजे यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटेगाव येथील मतदान केंद्रावरील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात उपस्थित पोलीस हा एक नंबरचे बटन दाबण्याबाबत काहींना सूचना करत असल्याचा आरोप उपस्थित लोकांनी केला होता. या प्रकरणी बाळासाहेब गरजे या पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने फिर्यादीत म्हटले आहे की, माटेगाव येथील बुथ क्र. 49, 50 च्या आवारात येऊन गोंधळ करून तू लोकांना नंबर एकचे बटन दाबायला का सांगतो? असे म्हणत शिवीगाळ व धक्काबुक्की करून फिर्यादी पोलिसाचा मोबाईल हिसकावून घेत त्यामधील शुटींग डिलीट करून अन्य एका मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत तो प्रसार मध्यमांना व्हायरल केला. सदरचे कृत्य हे शासकीय कामात अडथळा असल्याचे संबंधिताने म्हटले. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. इकडे दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बाभळगाव येथे सुनील निकाळजे यांनी मतदान केंद्राच्या आवारात वाहन उभे केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.