हजारो लिटर दारू केली नष्ट
बीड (रिपोर्टर) नवगण राजुरी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी तयार करून ती परिसरात विकली जात होती. बीड ग्रामीर पोलिसांनी आज सकाळी या भागात तीन ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि रसायन नष्ट केले. या वेळी 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करत तिघा जणांवर बीह ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीभाऊ कोंडीबा पवार (रा. खडकतवस्ती, नवगण राजुरी) हा खडकत वस्ती नवगण राजुरी शिवारात हातभट्टी तयार करून त्याची परिसरात विक्री करत होता. बीड ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून दोनशे लिटरचे पाच मोठे बॅरल रसायन नष्ट केले. यासह लहान-मोठ्या बॅरलमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन साठवले होते. ते सर्व पोलिसांनी नष्ट केले. याचबरोबर इतर दोन ठिकाणीही पोलिसांनी धाडी मारल्या असून तेथेही हजारो लिटर रसायन नष्ट करून बॅरल फोडले आहे. या प्रकरणी गोपीनाथ धोंडीराम पवार, हरिभाऊ धोंडीराम पवार (दोघे रा. नवगण राजुरी) आणि विश्वांभर आश्रुबा गायकवाड (रा. लिंबारुई) अवैध हातभट्टी तयार करून त्याची विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत, सुनिल अलगट, अनिल घटमाळ, मुंडे, जायभाये यांनी केली.