घोंगडी बैठकीपूर्वी शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतली रात्री जरांगेंची भेट
मराठा आरक्षणासह शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा
मंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन सादर करणार तपशील
गेवराई (रिपोर्टर): राज्य सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावरून टकराव सुरु असताना अन् आजपासून जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला सुरुवात होणार असताना तत्पूर्वी रात्री शिंदे सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेतली. दिर्घकाळ दोघात चर्चा झाली. त्याच वेळी जरांगे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात भ्रमणध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून या चर्चेमध्ये मराठा आरक्षणासह शेतकर्यांचे काही प्रश्न जरांगे यांनी सरकार दरबारी मांडले आहेत. आज मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा होऊन काही निर्णय लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेणार असल्याचे जरांगेंच्या भेटीनंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
बुधवारी रात्री शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार हे शंभर गाड्यांचा ताफा घेऊन थेट अंतरवली सराटीत गेले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत अब्दुल सत्तार यांनी वेगवेगळ्या विषयांवर जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा केली. आजपासून जरांगे पाटील यांच्या राज्यभरात घोंगडी बैठका सुरू होणार आहेत. तत्पूर्वी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जरांगे भेटीला अधिक महत्व येत आहे. विशेष म्हणजे या भेटीत जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रमणध्वनीवरून चर्चाही झाली. शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत आमच्यात चर्चा झाल्याची माहिती थेट जरांगे पाटील यांनीच दिली. शेतकर्यांच्या प्रश्नाबरोबर मराठा आरक्षणाबाबत काही ना काही तरी तोडगा काढावा लागणार आहे, असं मत अब्दुल सत्तार यांनी या वेळी व्यक्त केलं. विशेष म्हणजे आज मंत्रीमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत रात्रीच्या चर्चेचा तपशील आणि त्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार हे जरांगे पाटील यांच्यासोबत जे काही बोलले आहेत आणि जरांगे पाटील यांचे जे काही म्हणणे आहे ती सर्व चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या कानी घालणार असल्याचे सांगण्यात येते. सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात जो काही टकराव आहे या भेटीनंतर तो सौम्य होतो का? याकडे विशेष लक्ष असून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला जबरदस्त फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी सरकार जरांगे पाटील यांच्यासोबत सुलाहनामा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.