परळी (प्रतिनिधी) – 2020 मध्ये सत्तेत आल्यानंतर बीड जिल्ह्यातून पळून गेलेल्या विमा कंपन्यांना वठणीवर आणत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने शेतकऱ्यांना नियमाच्या पलीकडे जाऊन पिक विमा मिळावा तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यापेक्षा झुकते माप मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले व त्याचे यश हे शेतकऱ्यांना झालेल्या फायद्यामध्ये तसेच त्यांच्या बँक खात्यात झालेल्या रकमांमधून सुद्धा दिसते. प्रसंगी महाराष्ट्रात पहिल्यांदा विमा कंपनीच्या विरोधात पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेणारे धनंजय मुंडे यांच्यावर पाच वर्ष दडून बसलेल्या विरोधकांनी आई निवडणुकीच्या तोंडावर पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे समर्थ आहेत असे प्रत्युत्तर परळीतील पत्रकार परिषद घेणाऱ्या व आमदारकीच्या गुदगुल्या होत असलेल्या नेतेमंडळींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांनी दिले आहे.
परळी येथे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष-पक्ष असा लपंडाव खेळणारे राजेसाहेब देशमुख, सुदामती गुट्टे, शेतकऱ्यांना फसवले प्रकरणी गुन्ह्यात आरोपी असलेले कालिदास आपेट, नावाला भाजपचे असणारे अच्युत गंगणे, राजेश देशमुख इत्यादी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर अर्धवट व खोट्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप केले होते, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहिलेल्या व मुंडेंविषयी मनात विष घेऊन कुटील राजकारण करणाऱ्या काही जणांना कावीळ झाला असल्याने त्यांना संपूर्ण जग पिवळे दिसत आहे, मात्र धनंजय मुंडे हा रस्त्यावर उतरून शेतकरी कष्टकरी वर्गासाठी काम करणारा नेता आहे त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अर्धवट आणि खोटी माहिती पेरून विरोधक धनंजय मुंडे यांची बदनामी करू पाहत आहेत. अशा विरोधकांना आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही गोविंदराव देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. मुळात 2020-21 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना लॉकडाऊन काळात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान एकीकडे कोविड मुळे असलेले निर्बंध व दुसरीकडे विमा कंपनीकहे नुकसानीच्या तक्रारी 72 तासात ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्याची आडमुठी भूमिका यामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना त्यावेळी ऑफलाईन पंचनामे झालेल्या नुकसानीचा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरी या प्रकरणात राज्य सरकार म्हणून धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी विमा कंपनीच्या विरुद्ध भूमिका घेऊन शासन स्तरावर विमा कंपनीचे अपील फेटाळून लावलेले आहेत. त्याबद्दल अजूनही पाठपुरावा सुरूच असून, आवश्यकता भासल्यास त्यासाठी आपण कोर्टात जाऊ, अशी जाहीर भूमिका मुंडे साहेबांनी घेतलेली आहे. मात्र केवळ दिखाऊ गवगवा करणाऱ्या विरोधकांना याचे सोयरसुतक नाही. 2023 च्या विम्याच्या बाबतीतही अंतिम कापणी अहवालात 2024 च्या एप्रिल महिन्यात केंद्रातील सरकार अस्तित्वात नसताना, केंद्र स्तरावर झालेल्या निर्णयातील अडसरामुळे बरेच शेतकरी अपात्र ठरू शकतात, त्यामुळे मुंडे साहेबानी याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करून याबाबतही तोडगा काढण्यासाठी शब्द घेतला आहे. पण त्याआधीच जर पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या तर विमा कंपनी संबंधित शेतकऱ्यांचे विमा देयके देण्यास बांधील राहणार नाही, ही साधी गोष्ट विरोधकांना लक्ष्यात येत नाही, म्हणजे? मुळात यांना शेतकऱ्यांचा फायदा-तोटा याच्याशी देणेघेने नसून फक्त मुंडेंवर टीका करून आपली राजकीय उंची वाढवण्याचे काम करायचे आहे. मात्र धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून आम्ही विरोधकांचे हे डाव कधीही सफल होऊ देणार नाहीत, असा स्पष्ट ईशारा गोविंदराव देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे अर्धवट आणि खोटी माहिती पेरून धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हणत परळीत विरोधकांनी पुकारलेला मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रति पुतना मावशीचे प्रेम असल्याची जहरी टीका गोविंदराव देशमुख यांनी केली आहे.