आष्टी (रिपोर्टर) जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवकांचा एकीकडे सत्कार सोहळ्याचे नियोजन बीडमध्ये होत असताना दुसरीकडे आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील ग्रामसेवकास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने जेरबंद केल्याची माहिती समोर येत आहे. सदरची कारवाई ही अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे.
गावपातळीवर सर्वसामान्य नागरिकांचे ग्रामसेवकांकडे अनेक छोटे मोठे काम असतात. बेबाकी घेणे, पीटीआर यासह अन्य कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये जावे लागते. मात्र लाचेचे रगत तोंडाला लागलेले काही लाचखोर ग्रामसेवक छोट्या कामासाठीही लाच मागतात. आता लाचखोरांमध्ये महिला अधिकारी कर्मचार्यांचाही पुढाकार असल्याचे समोर येत आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील ग्रामसेवक सोनाली अरविंद साखरे यांनी पीटीआरसाठी अर्जदाराकडे तीन हजार रूपयांची लाच मागितली. अर्जदाराला लाच द्यावयाची नव्हती. म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याबाबत लेखी तक्रार केली. तक्रारीतले सत्य जाणून घेतल्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक सिनेकर, पीआय धस यांनी पिंपळगाव घाट याठिकाणी सापळा रचला असता तीन हजार रूपयाची लाच घेताना रंगेहात पकडले.