Tuesday, December 7, 2021
No menu items!

योध्दा


रद पवार यांच्या नावाच्या पुढे कुठलेही पद लावण्याची गरज नाही. पवार हे नावचं पुरं आहे. पवार नावात ‘पॉवर‘ आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एवढा मोठा अनुभव असणारा राजकीय नेता सध्या देशात कुणीच नाही. पवारांचे मैत्रीचे हितसंबंध देशातील सर्वच राजकीय नेत्यांशी आहे, मग विरोधकही त्यांच्या कार्याचं कौतुक करत असतात. गावपातळीपासून ते संसदे पर्यंतचा दांडगा प्रवास पवारांचा राहिलेला आहे. देशातील कोणत्या राज्यात काय पिकतं आणि तेथील राजकीय परस्थिती काय आहे, याची त्यांना चांगली माहिती असते. ग्रामीण भागाच्या मातीतील नेता, म्हणुन त्यांची ख्याती आहे. कमी वयात त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं,हे वय खुप काही अनुभवी नव्हतं. मात्र स्वत:च्या राजकीय कौशल्याने त्यांनी कमी वयात मोठी भरारी घेतली. पवार यांचा राज्यात चांगला दबदबा निर्माण झाला. पवाराचं जसं राजकारण फुलत गेलं. तसं त्यांना विरोधाला समोरे जावे लागले.

त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टिका झाल्या. अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले, आणि आज ही होत आहेत. इतके आरोप होवून ही त्यांनी आरोप करणारांवर कधी राजकीय सुड उगवला नाही किंवा त्यांच्यावर खालच्या पातळीवर जावून आरोपही केले नाही. त्यांनी नेहमीच सहनशीलतेला स्थान दिले. राजकीय कारर्कीर्दीत अनेक चढ-उतार त्यांनी बघितले. सत्ता नसतांना ते कधी निराश झाले नाही किंंवा सत्ता आल्यानंतर कधी सत्तेचा अहंकार चढला नाही. वयाच्या साठी नंतर पवारांना दुर्धर आजाराने घेरले, ह्या आजारावर देखील त्यांनी मात केली. १९९९ साली त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिल्याच निवडणुकीत राज्याच्या सत्तेत आला. मनमोहनसिंगाच्या काळात केंद्रात स्वत: पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. राज्यात भाजपाचं सरकार आलं. राज्यात भाजपा प्रबळ होत असतांना २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते पक्ष सोडून जावू लागले. पक्षात कुणी राहतं की, नाही असं वाटत होतं, पण पक्ष सांभाळण्याचं काम स्वत; शरद पवार या ‘तरुण नेत्याने’ केलं. पक्षातील इतर शिलेदारांनी पक्ष फुटीमुळे हातपाय गाळले होते. अशा परस्थितीत एक ‘तरुण योध्दा’ महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघतो आणि लोकांचा ही तितकाच प्रतिसाद मिळतो हा तसा दुर्मिळ योग म्हणायचा. निवडणुका झाल्याशिवाय घरी परत येणार नाही,मला अनेकांना घरी बसवायचं आहे असं मी घरी सांगून आलो आहे, अशी प्रतिज्ञा पवार यांनी केली होती, त्यांनी आपला निर्धार खरा करुन दाखवला. इकडून-तिकडे उडया मारणारे अनेक जण घरीच बसले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अवघा महाराष्ट्र पालथा घातला. या वयात इतके दौरे याचं राज्यातील जनतेला आश्‍चर्य वाटत होतं. भाजपाने निवडणुकीत पवारांना रोखण्यासाठी अनेक मार्ग आखले होते.

पवार हेच महाराष्ट्रातील राजकारणाचा मोठा अडथळा आहे हे भाजपाला माहित होतं. त्यामुळे पवारांना जेरीस आणण्यासाठी ईडीचा वापर करण्यात आला. ईडीची नोटीस पवारांना पाठवण्यात आली. याची सगळीकडे चर्चाच-चर्चा झाली. आता काय होणार असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडला होता. ईडी आपल्याकडे येण्याऐवजी मीच ईडीकडे जातो अशी घोषणा पवारांनी केल्यानंतर ईडीची घाबरगुंडी उडाली आणि ईडीने ‘हात’जोडले. ईडीचा ‘बार’ पवारांनी फुसका केला. मात्र त्यानंतर अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून थोडी घाण केली होती, याला ही सावरत पवारांनी पुढे चालण्याचा निर्धार केला. २०१९ ची निवडणुक फक्त आणि फक्त पवारांच्या जीवावर होती. कॉंग्रेस पक्ष तर पुर्णंता नशीबावर अवलंबून होता. राष्ट्रवादी-कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे मिळून चाळीस ही आमदार निवडून येणार नाही, असं वातावरण विरोधकांनी निर्माण केलं होतं. विधानसभे सोबत सातारा लोकसभा निवडणुक जाहीर झाली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे या ठिकाणी पोट निवडणुक जाहीर झाली होती. सातार्‍याची निवडणुक प्रचंड अटीतटीची होती. पवारांची पावसातील सभा देशात गाजली. पवारांनी पावसात भाषण केल्याने लोकांच्या मनात पवाराबाबत प्रचंड आत्मियता निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जास्त जागा आल्या असल्या तरी राष्ट्रवादीने चांगल्या ५४ जागा मिळवल्या. त्यामुळे राज्यात पवार आणि पवार अशीच चर्चा होवू लागली. सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेकडे बहुमत होतं, पण शिवसेना भाजपाच्या सोबत गेली नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बरेच चढ-उतार आले. बहुमता अभावी फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली.

अशा परस्थितीत फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेवून लोकं झोपत असतांना शपथविधी उकरला.अजित पवार फडणवीसांच्या बरोबर गेल्याने राष्ट्रवादी फुटली की काय असचं जो-तो म्हणत होता. मात्र पवार शिवसेनेच्या सोबत जाण्याच्या ठाम बाजुने होते. पक्ष फुटला नाही, असं म्हणत पवारांनी राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन होत आहे, त्याला कसली ही बाधा येणार नाही असं ठणकावून सांगितले. पवारांनी महाआघाडीचं सरकार स्थापन केलं, हे सरकर स्थापन करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे. पवार काय करु शकतात हे अवघ्या देशाने पाहितलं. महाराष्ट्राचा आणि पवारांचा नाद करायचा नाही असाच संदेश पवारांनी राज्यात तीन पक्षांची सत्ता स्थापन करुन भाजपाच्या दिल्लीश्‍वरांना दिला. शेतकर्‍यांचे कुठले ही प्रश्‍न असो, पवार थेट बांधावर जातात. अतिरिक्त पावसाने राज्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सगळ्यात आधी पवार बांधावर पोहचले. कोरोनाच्या काळात पवार कधी शांत बसले नाही. पवारांनी कधीच जनतेची नाळ तुटू दिली नाही. लोकांतील नेते म्हणुन पवारांची ख्याती आहे. लोकांचे प्रश्‍न जाणुन घेणारा जाणता नेता म्हणजे शरद पवार. पवार ८० वर्षाचे झाले, पण त्यांचं काम पाहता ते ८० वर्षाचे वाटत नाही. तरुणांना लाजवेल असं त्यांचं कार्य आहे, ते एक योध्दाच आहेत. या ‘तरुण योध्दाला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा!

majeed shekh
मजीद शेख-बीड

Most Popular

error: Content is protected !!