गेवराई (रिपोर्टर): अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. त्या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे बोलले जाते. आता जरांगे पाटील गेवराई विधानसभेबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आतापर्यंत आपण पक्षाच्या बंधनात होतो, आता पक्षाचे बंधन नसणार, असं म्हणत जेव्हा मराठा समाजाचे आंदोलन चालू होते, तेव्हा आंदोलकांनी राजीनामा मागितला होता. त्यावेळेस आपण राजीनामा तात्काळ देत आंदोलकांच्या हाती स्वाधीन केला होता, यासह अन्य बाबींबाबत आ. लक्ष्मण पवारांनी जरांगे यांच्यासोबत केलेल्या चर्चेत आशय असल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी गेवराईची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली आणि त्याठिकाणी बदामराव पंडित उमेदवार झाले. तत्पुर्वी भाजपाला रामराम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ पाहणारे लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळाली नाही. शरद पवारांसोबत त्यांची भेटही झाली. परंतु उमेदवारी मिळाली नसल्याने लक्ष्मण पवार हे पुन्हा गेवराईत डेेरेदाखल झाले आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. रात्री अचानक आ. लक्ष्मण पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवली सराटी येथे गेले. त्याठिकाणी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. लक्ष्मण पवारांच्या जरांगे भेटीने प्रतिस्पर्धी बदामराव पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या गोटात खळबळ उडवून दिली. आता जराांगे पवारांना मदत करतात का? पाठिंबा देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.