शपथविधीचा मुहूर्त निश्चित; सरकार स्थापनेचा तिढा सुटणार
मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून 10 दिवस उलटून गेले तरी महायुतीला अद्याप सरकार स्थापन करता आले नाही. यावर विरोधक एकीकडे आरोप करत असताना दुसरीकडे गावी गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईत डेरेदाखल होत असून संध्याकाळी महायुतीची महत्वपुर्ण बैठक होत असून यामध्ये मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर सुटणार असल्याचे सांगण्यात येते तर भाजपाचे बावनकुळे यांनी शपथविधीचा मुहूर्त ठरल्याचे सांगत सरकार स्थापनेचा तिढा आज सुटण्याचे संकेत दिले. इकडे शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांनी मात्र ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेव्हा जेव्हा दाढीवर हात फिरवला तेव्हा तेव्हा काय झाले, ते ठाकरेंना माहित असल्याचे म्हणत एकप्रकारे इशाराही दिला.
राज्यात महायुतीला 231 जागा मिळाल्या असतानाही दहा दिवसात महायुतीने सरकार स्थापन केलेले नाही, किंवा मुख्यमंत्री कोण याचेही उत्तर दिले नाही. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातार्यातील दरेगावात जाऊन बसले. काल त्यांची तब्येत खराब असल्याचे सांगण्यात आले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधत प्रकृतीची चौकशी केली. दुसरीकडे राज्यात सरकार स्थापन्याच्या हालचालींना वेग आल्याचे सांगत भाजप अध्यक्ष बावनकुळे यांनी 5 तारखेला शपथविधी होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज एकनाथ शिंदे हे सातार्यातल्या दरेगावातून मुंबईत डेरेदाखल होत आहेत. संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची एक महत्वपुर्ण बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोणाला किती मंत्री याचेही उत्तर या बैठकीतून महाराष्ट्राला मिळणार आहे. तत्पूर्वी शिंदे सेने संजय शिरसाट यांनी माध्यमाशी बोलताना एक इशारा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठं काही तरी घडतं, त्यामुळे ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेता कामा नये, ठाकरेंनी तेव्हा हलक्यात घेण्याचे काम केले आणि आता त्यांची आम्ही काय अवस्था करून ठेवली, हे महाराष्ट्राने पाहिलं. जेव्हा एकनाथ शिंदे मुंबईत येतील तेव्हा सर्व घडामोडी घडतील. कोणी त्यांना हलक्यात घेता कामा नये, असा इशारा दिला.