गणेश सावंत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीला जे यश मिळाले ते अनाकालनीय म्हणावे लागेल. हा अनाकालनीय शब्दप्रयोग आम्ही एवढ्यासाठीच करतो, जिथे महायुती विरोधात प्रचंड रोषजनक वातावरण पहावयास मिळत होतं, जिथे आरक्षण आंदोलनाच्या भडक्याने महायुतीचे हातच नव्हे अंग अंग पोळत होते, जिथे शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर मिळत नव्हते, जिथे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहत होता, जिथे भ्रष्टाचार, सैराचार, आणि अनाचार पदोपदी पहायला मिळत होते तिथे असा निकाल लागावा, हे विरोधकांना सोडा महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही पचनी पडायला जड जातेय आणि हे सत्य स्विकारावे लागेल. मग इथे महायुतीची व्यूहरचना यथायोग ठरली काय, महाआघाडीला महायुतीची व्यूहरचना भेदता आली नाही का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतानाच पुन्हा एकदा ईव्हीएमचा संशयकल्लोळ राज्यात निर्माण होणं यात आम्हाला तरी गैर वाटत नाही. एकतर सातत्याने ईव्हीएमबाबतचा संशयकल्लोळ निर्माण करणार्या पराभूत पक्षांनी त्यातलं सत्य समोर आणावं, नसता सरकारने तरी हा संशयकल्लोळ दूर करण्याबाबत एखादं प्रात्यक्षिक जनतेसमोर मांडावं, तेव्हाच कुठे हा संशयकल्लोळ दूर होऊ शकेल. या अनाकालनीय मताबद्दल जेव्हा प्रश्नचिन्ह उभे केले जातात, तेव्हा
लोकसभेचा निकाल
लक्षात घेतला जातो. सहा महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 17-30 ने पराभव स्विकारावा लागला, म्हणजे उभ्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. मग असे सहा महिन्यांमध्ये नेमके काय झाले? महायुतीने स्वत:मध्ये अशी काय सुधारणा केली, की महाराष्ट्रातली जनता थेट महायुतीच्या नेतृत्वाची पाईक झाली. पाईक हा शब्दप्रयोगही एवढ्यासाठीच करतोय, पंच्याहत्तर टक्के जागा जेव्हा एखाद्या महायुतीच्या येतात ना, तेव्हा त्या युतीवर जनतेचे प्रेम हे ओसंडूनच आहे, असे म्हणावे लागते. 17-30 चा पराभव विधानसभेच्या निवडणुकीत 235-50 ने विजयी होतो, त्या वेळेस मात्र महायुतीच्या मताबरोबर
महाआघाडीचे पानीपत
शब्दबद्ध होणे क्रमप्राप्तच. महायुतीचा विजय, त्यांनी केलेल्या व्यूहरचनेसह लाडकी बहीण योजनेतून आलेला असेलही परंतु गेल्या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारमध्ये जो जनतेत रोष निर्माण झालेला होता त्या रोषाला कॅश करण्याचे परिमाण आघाडीत नव्हते की आघाडीची आणि आघाडीच्या नेेत्यांची निवडणूक लढविण्याची लायकीच नव्हती? आघाडीच्या पराभवाला अनेक कारणे आणि त्या कारणांची झालर आपल्याला लावता येईल. सर्वप्रथम आघाडीकडून महायुतीच्या व्यूहरचना भेदण्यासाठी कुठलेही उत्तर शोधता आले नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार समोर मांडता आला नाही, उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत जागा वाटपाचा तिढा त्यांना सोडवता आला नाही आणि जागा वाटपातही उमेदवार देताना ज्या काही मांडवल्या झाल्या त्या आघाडीच्या नेत्यांनीच घरभेदींची भूमिका बजावली. त्यात आघाडीचे पानीपत निश्चित म्हणावे लागेल. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्या पद्धतीने राज्यभरात वातावरण होते ते वातावरण वरून महायुती विरोधात प्रामुख्याने दिसून येत होते मात्र महायुतीच्या राजकीय धूर्त नेत्यांनी महाराष्ट्राची मानसिकता आणि महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखली आणि त्यानुसार महाराष्ट्रात निवडणूक लढविली. महायुतीच्या यशामागे
धूर्तनीती आणि
मतांचे ध्रुवीकरण
हे दोन मुख्य कारण नक्कीच आहेत. तोडा आणि फोडाचे राजकारण अवघ्या देशाला माहित आहे, या राजकारणातून या देशावर अनेकदा अनेकांनी राज्य केले, त्यात आता महायुतीने फोडा आणि तोडाचे राजकारण करत राज्य केले तर काय? असे सहजतेने तुम्हा-आम्हाला म्हणता येईल परंतु जेव्हा राजकारणामध्ये धूर्तनीती अवलंबली जाते तेव्हा प्रतिस्पर्ध्याने त्या धूर्तनीती, चक्रव्यूह भेदण्यासाठी चांगला धनुर्धर व्हावे लागते. तो धनुर्धर आघाडीमध्ये नक्कीच या निवडणुकीमध्ये जन्मला नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही निवडणूक होत होती तेव्हा अनेक जाती एकमेकांसमोर उभ्या होत्या. मराठा विरुद्ध ओबीसी हे तर थेट महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांसमोर उभे केले होते. मराठा हा मोठा समाज आघाडीचा समर्थक तर ओबीसी हा महायुतीचा समर्थक असा थेट सामना नेत्यांकडून रंगवला जात होता. तेव्हाच महायुती आणि त्यातील नेते या जातीय वादाचा फायदा उठवणार हे निश्चित झाले होते. म्हणूनच निवडणुका घोषीत होण्याअगोदर फडणविसांसारख्या राजकीय चाणक्याने ओबीसी हा भाजपाचा डीएनए आहे, असे उघडपणे म्हणून ओबीसीवर भाजपाची मक्तेदारी दाखवून दिली होती. तशी आघाडीला मराठा, दलित, मुस्लिम यांच्यावर मक्तेदारी दाखवता आली नाही. जेव्हा प्रत्यक्षात निवडणुकांना सुरुवात झाली तेव्हा महायुतीच्या नेत्यांनी
झारीतले शुक्राचार्य
महाराष्ट्रातल्या बहुतांशी मतदारसंघात शोधले नव्हे तर आधीच शोधून ठेवलेले उभे केले. ज्या भागांमध्ये ज्या जातीचा प्रभाव आहे आणि जिथे मराठे-मराठेत्तर असा वाद आघाडीवर आहे तिथे प्रामुख्याने मराठा उमेदवार देत त्या मराठा उमेदवाराच्या मताचे ध्रुवीकरण कसे होईल, त्याची विभागणी कशी होईल, यासाठी अनेक अपक्षांची मोट त्या त्या मतदारसंघात उभी केली. मग एक हजार मतापासून ते 20 हजार मतांपर्यंत त्यांनी मजलही मारली. तर युतीतील काहींनी ओबीसींच्या मतांचे ध्रुवीकरण कसे करता येईल हेही तपासून पहात जिथे तिथे उमेदवार दिले. त्यातून मतांची विभागणी झाली आणि लोकसभेला 17-30 वर पराभूत असलेल्या महायुतीला विधानसभेत 235-50 ने चांगला दणदणीत विजय मिळवता आला. आता आघाडीच्या पानीपतपेक्षा आणि महायुतीच्या अनाकालनीय विजयापेक्षा पुन्हा एकदा
मशीनचा घोळ
यावर जो काथ्याकुट होत आहे ते सत्य की असत्य? हे सर्वसामान्यांना समजायला मार्ग नाही. कारण याच मशीनच्या माध्यमातून जेव्हा लोकसभेत आघाडीचा विजय झाला तेव्हा आघाडीच्या नेत्यांनी त्या मशीनवर विश्वास ठेवला आणि आता पराभव झाला म्हणून लगेच वोटींग मशीनवर संशय घेणे म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे उत्तर लोकांकडून येणे साहजिक. परंतू आम्ही मशीनच्या घोळाबाबत साशंकीत एवढ्यासाठीच आहोत, 20 तारखेला मतदान झाले, 5 वाजेपर्यंत मतांचा टक्का हा 58.22 वर होता, रात्री मतपेट्या बंद झाल्या त्या वेळेस हा मताचा टक्का 65.02 वर गेला आणि जेव्हा प्रत्यक्षात 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होते तेव्हा सकाळी हाच मतांचा आकडा 68.05 वर गेला, मग हे नऊ साडेनऊ टक्के मत नेमके आले कुठून? तेही जाऊ द्या 65 चे 68 झाले कसे? हे प्रश्न अनुत्तरीत असले तरी याचे जेव्हा उत्तर सरकारला देता येईल ना किंवा निवडणूक आयोगाला या आकड्याच्या खेळाचा खरा परिणाम जनतेसमोर मांडता येईल ना तेव्हा यातला संशयकल्लोळ दूर होईल नाही तर पुन्हा पुन्हा जनता ईव्हीएम मशीन मतदानाबाबत संशयकल्लोळात राहील. आता तर उघडपणे भारतीय जनता पार्टी छोटे राज्य विरोधकांना देते आणि मोठ्या राज्यांवर ईव्हीएममध्ये घोळ करत आपल्याकडे ठेवते, असा थेट आरोप होतोय. त्यात तथ्य काय या आरोपातला अनाठीई मतलब किती ? प्रश्नच. परंतु
लोकशाहीच्या देशात
जात-पात-धर्म-पंथावर एकतर निवडणुका लढवल्या जाऊ नयेत. खरंतर कालची विधानसभा निवडणूक ज्या जात-पात-धर्मावर लढवली गेली त्यामध्ये कुठेही विकासाचा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत गरजांचा वावर पहायला मिळत नव्हता. शिक्षण, सिंचन, शेती, आरोग्य याची कुठे चर्चा नव्हती. त्याबाबतचे कुठे चिंतन-मंथन आणि सक्षम धोरण नव्हते. होते ते केवळ तो अमूक जातीचा, हा तमूक जातीच. यातून देशाच्या एकतेला प्रगतीबरोबर विकासाला नक्कीच खिळ बसेल. महायुतीचे हे अनाकालनीय यश आणि आघाडीचे झालेले पानीपत अभ्यासाचा नक्कीच विषय असेल आणि तो अभ्यास मला वाटतं, आजच्या तरुण पिढीने नक्कीच करावा.