पोलीस अधिकार्यांसह मंत्र्यांवर करीत होता बेछूट आरोप
पोलीस दलातून तात्काळ डिसमिस, आज दुपारनंतर न्यायालयात हजर करण्याची शक्यता
बीड, (रिपोर्टर)ः- बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांपासून नेत्यांपर्यंत बेछुट आरोप करणारा बीड सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रणजित कासले याला अखेर आज पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी त्याला बीड मध्ये आणण्यात आले असून दुपार नंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. कासले याने व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस अधिकार्यांना तो थेट आवाहन देत होता. दुसरीकडे संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र यांनी निलंबित कासले याला पोलीस खात्यातून डिसमिसचे आदेश काढले आहेत.

याबाबत अधिक असे की, रणजित कासले हा सायबर पोलीस ठाण्यात असतांना त्याने विना परवानगी आरोपीला घेवून गुजरातला जात तेथे त्याने आरोपीकडून पैसे घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यानुसार चौकशी करून बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी कासले यासह 26 मार्च 2025 रोजी निलंबित केले होते. त्यानंतर कासले याने एका पाठोपाठ एक व्हिडिेओ सोशल मिडीयावर व्हायरल करत पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह राजकीय नेत्यांवर आरोप करायला सुरूवात केली. एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले म्हणून बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून 14 एप्रिल रोजी कासले विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कासले याने हिंमत असेल तर पकडून दाखवा असे महाराष्ट्र पोलीसांचा आवाहन केले. मात्र त्यानंतर बुधवारी त्याने पोलीस माझे आहेत असे म्हणत आपण पुण्यात गुरूवारी सकाळी बीड पोलिसांना शरण येणार असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडीयांवर प्रसारीत केला. काल दिल्लीवरून तो पुणे येथील विमानतळावर आला. त्या ठिकाणी माध्यमांशी त्याने थेट संवाद साधत मी पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अनेक आरोपही केले. तो शरण येण्यापुर्वी आज पहाटे बीड पोलिसांनी स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये रणजित कासले असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेवून थेट बीड गाठले. आज दुपारनंतर कासलेला न्यालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे माहिती आहे.
कासले डिसमिस
बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत असलेला वादग्रस्त रणजित कासले याने गेल्या पंधरा दिवसाच्या कालखंडात व्हिडिओद्वारे सोशल माध्यमांवर धुमाकूळ घातला होता. अखेर त्याला अटक होण्यापुर्वीच गुरूवारी रात्री छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी कासले याला पोलिस खात्यातून डिसमीसचे आदेश काढले. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी ही माहिती दिली.