पुणे आळंदीतून घेतले मुख्य आरोपीला ताब्यात
बीड, (रिपोर्टर)ः- बिलाच्या वादावरून गावरान धाबा चालकाचा खून करून पसार झालेल्या टोळक्यापैकी तिघाजणांच्या मुसक्या बांधण्यात स्थानिक गुन्हा शाखेसह माजलगाव पोलिसांना यश आले असून रात्री पुणे व आळंदी परिसरातून सापळा रचत पोलिसांनी यातील मुख्य आरोपी रोहित शिवाजी थावरे, ऋषीकेश रमेश थावरे, कृष्णा माणिक थावरे या तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आज सकाळी या तिघांना माजलगाव पोलिसात आणले असून दुपारी नंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचा गावरान धाबा आहे. या धाब्यावर दोन दिवसापुर्वी रोहित शिवाजी थावरे आणि त्याचे अन्य मित्र त्या ठिकाणी आले होते. यामध्ये ऋषीकेश थावरे, कृष्णा थावरे यांच्यात आणि हॉटेल मालकात बिलावरून वाद झाला. या वेळी या थावरेच्या टोळक्याने हॉटेल मालक महादेव गायकवाड यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना वाचवण्यासाठी आलेला त्याचा मुलगा आशुतोष गायकवाड यालाही प्रचंड मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघेही बाप लेक जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रूग्णालयामध्ये उपचार घेतांना महादेव गायकवाड यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
चार दिवसात खूनाच्या दोन घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. मारहाणीची घटना करून आरोपी फरार झाले तर दुसरीकडे आशुतोष यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांसह अन्य दोघांजणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात गंभीर घटनांना अंजाम देतांना आरोपी डगमगत नाहीत. याचाच अर्थ पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक राहिलेला नाही. यामुळे पोलीस यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला जावू लागला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध सुरू केला. हे तिन्ही आरोपी पुणे भागातील नगर परिषद चौक परिसरात असल्याचे पोलीस प्रशासनाला माहिती झाल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, स्थानिक गुन्हा शाखेचे उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार भागवत शेलार, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, राजू पठाण, बप्पासाहेब घोडके, सुरवसे, चालक गणेश मराडे यांनी केली.