मुंबई, (रिपोर्टर)ः- सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांकी झेप घेतली आहे. कमकुवत डॉलर आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या अनिश्चिततेमुळे नवीन मागणी वाढल्याने सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींनी एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉरचा परिणाम संपूर्ण शेअर बाजारावर झाला. मंदीच्या भीतीमुळे लोक शेअर बाजारातून पैसे काढून सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत परिणामी दोन्ही मौल्यवान धातूचे भाव आता गगनाला भिडले आहेत.

सोन्याच्या रोज बदलत्या किमती सामान्य लोकांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी विशेष महत्त्वाच्या असतात विशेषतः लग्नसराई किंवा सणोत्सव जवळ येतात सोन्याच्या किमतीकडे सर्वांच्याच नजरा खिळलेल्या असतात. अशा स्थितीत आज, 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत पाहून सामान्यांना धडकी भरेल एवढी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर चउद वरील सोन्याचा जून वायदा दरांनी मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 99,178 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला, जो मागील बंदपेक्षा जवळपास 1,900 रुपयांनी वाढला.








