बीड (रिपोर्टर) संघटनेच्या कर्तव्य कर्मासह राजकारण आणि समाजकारणाला तेवढेच महत्व देणारे कुंडलिक खांडे यांनी अखेर शिवसेनेसोबत न जाता थेट शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेत जिल्हाप्रमुखपद स्वीकारल्यानंतर बीडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का समजला जातोय. तर शिंदे गटाचा दबदबा खांडेंच्या माध्यमातून पडताना दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेपेक्षा शिंदे गटाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी खांडे प्रयत्न करणार असून बीड मधून शिंदे गटाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून मोठी ताकद मिळणार आहे. खांडेंच्या निवडीनंतर जिल्ह्यात समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये तितक्याच ताकतीने उतरण्याचा निर्णय खांडे यांनी घेतल्याचे सांगण्यात येते.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद यशस्वीरित्या पार पाडत बीडमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी धडपड करणारे कुंडलिक खांडे हे अखेर शिंदे गटामध्ये सामील झाले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार, खासदारांचाच नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यातून आजी-माजी पदाधिकार्यांचा पाठिंबा मिळत आहे. कुंडलिक खांडे यांनी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते जिल्हाप्रमुख म्हणून निवडले गेले. खांडेंच्या निवडीने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खांडे यांच्या लढवय्या भूमिकेमुळे याचा फायदा शिंदे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये होईल, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार शिंदे गटाचे कसे निवडून येतील यासाठी आतापासूनच खांडे यांनी व्यूहरचना आखायला सुरुवात केलीआहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक प्रत्यक्षपणे लढणारे खांडे यावर्षी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून स्वत:सह शिंदे समर्थकांना मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करणार आहेत. कुंडलिक खांडे यांच्या शिंदे गट प्रवेशाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लढवय्या शिवसैनिक मिळाला आहे.