बीड (रिपोर्टर) शेतकर्यांवर सातत्याने कुठले ना कुठले संकट कोसळत आहेत. अशा संकटाच्या काळात शासन शेतकर्यांना मदत करण्याकडे टाळाटाळ करत आहे. 2020 चा विमा अद्यापही दिला नाही. यासाठी अनेकवेळा आंदोलन, मोर्चे केले, तरीही विमा कंपनीला कसलाही फरक पडला नाही. 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 4 लाख शेतकर्यांना विमा मिळाला नाही तर 16 ऑगस्टपासून जिल्हाभरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा. सुशिला मोराळेंसह आदींनी दिला आहे.
विम्याच्या संदर्भात आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेस अॅड. जगतकर, वसंत मुंडे, प्रकाश भंसाळी, राजाभाऊ देशमुख, अविनाश मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना मोराळे म्हणाल्या की, 2020 आणि 2021 च्या विम्याची रक्कम मिळावी, यासाठी 25 मोर्चे काढून अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय पातळीवर विम्याच्या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही. शेतकर्यांवर सातत्याने कुठले ना कुठले संकट कोसळत असतात अशा परिस्थितीत शेतकर्यांना आधार देण्याचे काम शासनाने केले पाहिजे. 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सरकारला संधी देत आहोत, तोपर्यंत विम्याची रक्कम जर शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर 16 ऑगस्टला जिल्हाभरात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.