दिंद्रुड (रिपोर्टर) कुटुंबासमवेत बाहेरगावी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्याच्या घरी अज्ञात चोरट्याने चोरी करून घरामधील दीड ग्रॅम सोने व थकित वीजबील वसुलीचे 15 हजारांसह इतर वस्तुंची चोरी केल्याची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगण्यात येत असून या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांची गस्त नसल्यामुळे या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत असून चोरट्यांच्या सततच्या घरफोडींमुळे या भागातील नागरीक भीतीच्या वातावरणात दिसून येत आहेत.
याबाबत अधिक असे की, दिंद्रुड येथील डॉ. सतीश भोसले यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले कल्याण सुरवसे हे भाडेकरू आहेत. आपल्या कुटुंबासमवेत ते गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी राहतात. काल ते सहपत्नी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेले. या संधीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी रात्री दोन वाजण्याच्या
सुमारास घरामध्ये प्रवेश करत घरातील दीड ग्रॅम सोने, थकित बिलापोटी वसुल केलेले 15 हजार रुपये व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर घरमालक भोसले यांनी सुरवसे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सुरवसे यांनी पोलिसांना याबाबत सांगितल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येते. या भागामध्ये चोरीच्या घटना सातत्याने होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.