गेवराई तालुक्यात 3 ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात
अंबाजोगाई तालुक्यात 3 ग्रा.पं. भाजपाच्या तर 2 ग्रा.पं. राष्ट्रवादीकडे
गवळवाडीवर शिवसेनेचा झेंडा, अंथरवणपिंप्रीत पुतण्याची चुलत्यावर मात
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील तेरा ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाल्यानंतर आज सकाळी मतमोजणी झाली. गेवराई तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात तर एक ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेनेचा झेंडा फडकला. एक ग्रा.पं. अपक्षांच्या ताब्यात आली. बीड तालुक्यातील गवळवाडीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. अंथरवणपिंप्रीमध्ये चुलत्या पुतण्यात लढाई होऊन पुतण्याने चुलत्यावर मात केली. ग्रा.पं.चे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.
मुदत संपलेल्या 13 ग्रामपंचायतींसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज त्या त्या तहसील कार्यालयांमध्ये सकाळी मतमोजणी झाली. गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग ग्रा.पं. ही राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात गेली. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाचे सहा उमेदवार निवडून आले तर भाजपाचे पाच सदस्य विजयी झाले. दिमाखवाडीमध्ये राष्ट्रवादीचे चार, भाजपा दोन आणि एक अपक्ष निवडून आला. पाचेगावची ग्रा.पं.सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. जयराम तांडा ग्रा.पं.वर अपक्षांचं वर्चस्व राहिलं. सातही जागा अपक्षांनी जिंकल्या. वसंतनगर तांड्यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या सहा जागा निवडून आल्या. बीड तालुक्यातील गवळवाडी ग्रा.पं.वर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या गटाचे सात सदस्य निवडून आले. यामध्ये भागवत मस्के, अमृता मस्के, पुजा बाळासाहेब मस्के, पांडुरंग मस्के, वृंदावनी मस्के, गणेश मस्के, वर्षा मस्के हे उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवारांचा सत्कार जिल्हाप्रमुख अनिल जगताप, विजय जगताप, आकाश जगताप यांच्या वतीने करण्यात आला. या वेळी तालुकाप्रमुख गोरख शिंगण, संदीपान बडगे, जगदीश उबाळे, युवराज मस्के, लक्ष्मण मस्के, उद्धव मस्के, बाळासाहेब मस्के, भीमराव मस्के, दीपक साबळे, किसन मस्के, ज्ञानेश्वर मस्के, पप्पू मस्के, सतीश शिंदे, बंडु मस्के, राम काळे, बाळू काळे, आकाश मस्के, भारत गाडे, कृष्णा मस्के, ऋषी मस्के यांच्यासह आदींची उपस्थिती होती. तर अंथरवणपिंप्रीमध्ये चुलत्या-पुतण्याचा पॅनल उभा होता. यात पुतणे भाऊराव प्रभाळे यांनी चुलते नवनाथ प्रभाळे यांच्या पॅनलचा पराभव केला. भाऊराव प्रभाळे यांच्या पॅनलचे विद्या संतोष शिंदे, अशोक संताराम शिंदे, पुष्पा जालिंदर शिंदे, निवरुंगा भाऊराव प्रभाळे, गोवर्धन वाघमारे, अशोक शिंदे, कांताबाई भगवान पुर्भे हे उमेदवार विजयी झाले. अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी, दगडवाडी, श्रीपतरायवाडी, चनई, लोखंडी सावरगाव या पाच ग्रा.पं.चे निकाल जाहीर झाले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात तीन ग्रामपंचायत भाजपाकडे तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या. चनई ग्रा.पं. निवडणुकीत अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनलोक ग्रामविकास पॅनलचे 13 पैकी 13 जागा जिंकत बाजी मारली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. लोखंडी सावरगाव येथे राम दत्तात्रय मुंडे यांच्या नेतृत्वाखाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलने विजय मिळवत 11 पैकी 8 जागा ताब्यात घेतल्या. श्रीपतरायवाडी येथे राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 7 पैकी 5 जागा मिळवल्या. मोरेवाडी येथे औदुंबर मोरे, रामकिसन मोेरे यांच्या पॅनलने विजय मिळवला. भाजप आणि राष्ट्रवादी यांचा हा संयुक्त पॅनलचे सांगण्यात येते. दरडवाडी येथे खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 7 पैकी 5 जागा जिंकल्या. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. इतर ग्रामपंचायतींचा निकाल दुपारपर्यंत हाती आलेला नव्हता.