मुंबई (रिपोर्टर) लवकरच… लवकरच… लवकरच… हेच शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोंडातून निघतात. होईल… होईल… होईल… असे ते सांगत असतात. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, असे सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना विचारला आहे, ते आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे, वेगवेगळी संकट येतात, अनेक घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत, पालकांसमोर अनेक अडचणी आहेत, विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत, निर्णय कोण घेणार, असा सवाल देखील अजित पवारांनी केला आहे.
आम्ही दोघे आहोत… आम्ही दोघे आहोत… असे शिंदे-फडणवीस म्हणतात पण हे दोघे महाराष्ट्राला पुरू शकतात का? याचे तरी आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे. वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने याचा फटका राज्याला बसत आहे, तरी देखील त्यांना त्याचा भान राहिलेला नाही, अशी टीकाही पवारांनी यावेळी शिंदे-फडणवीसांवर केली.
पुढे ते म्हणाले की, आज शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून सिग्नल मिळाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी त्यांच्या हातातून काहीच घडणार नाही. पुर्वीच्या काळात काँग्रेस आणि शिवसेना असताना मंत्रिमंडळाचे निर्णय महाराष्ट्रात व्हायचे, दिल्लीत निर्णय होत नव्हते, अशी खोचक टीकाही अजित पवारांनी यावेळी भाजपवर केली.