बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत महाजन यांचा 26 वर्षीय मुलगा श्रीपाद हेमंत महाजन यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवदेहावर आज दुपारी बीड येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी न्यायधीश, वकील, डॉक्टर, पत्रकार यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत महाजन यांचे पुत्र श्रीपाद हेमंत महाजन हे पुणे येथे वकिली व्यवसाय करीत होते. अविवाहित असलेले श्रीपाद हे एकटे पुणे येथे राहायचे आणि न्यायाधीश हेमंत महाजन हे आपल्या कुटुंबियासोबत सध्या बीडमध्ये आहेत. रात्री श्रीपाद यांची प्रकृती अचानक खालावली. अल्पशा आजाराने त्यांचं दु:खद निधन झालं. याची माहिती कळताच महाजन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आज सकाळी श्रीपाद यांचा पार्थीव बीड येथे आणण्यात आला. दुपारी दोन वाजता श्रीपाद यांच्या पार्थीव देहावर शोकाकूल वातावरणात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राज्यातील अनेक न्यायाधीश, वकील, डॉक्टर, पत्रकार, सर्वक्षेत्रातील लोक उपस्थित होते. महाजन कुटुंबियावर कोसळलेल्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.









