मुंबई (रिपोर्टर) मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज 9 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी राहत्या घरी गुणी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. दुपारी 2.30 वाजता झावबा वाडी, ठाकुरद्वार येथून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. रंगभूमी जगलेला अभिनेता अशी त्यांची ओळख सांगितली तरी ती खोटी ठरणार नाही. त्यांचं ‘मोरुची मावशी’ हे नाटक विशेष गाजलं. याशिवाय या नाटकातील ’भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. ’नवरा माझा नवसाचा’, ’लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं. एक फुल चार हाफ (1991), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.