जळगाव (रिपोर्टर) शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढील खेपेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा कॅबिनेटमध्ये समावेश होणार का, याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पहिल्या मंत्रिमंडळात विस्तारात पंकजा मुंडे यांना संधी मिळेल, असे बोलले जात होते. परंतु, त्यांना पुन्हा डावलण्यात आल्याने पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले होते. यावर पंकजा यांनीही सूचकपणे नाराजी व्यक्त केली होती. चर्चेत असण्यासारखंच माझं नाव आहे. पण मंत्रीपदासाठी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोकं असतील, जेव्हा त्यांना वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा मला मंत्रीपद मिळेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.
या सगळ्या वादावर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, पंकजाताई नेमकं काय म्हणाल्या ते मी अजून ऐकलं नाही. ते मी नक्की ऐकेन. पण पंकजा मुंडे नाराज आहेत, असे मला वाटत नाही. पण पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील. पंकजा मुंडे यांना आणखी मोठं पद मिळेल. त्यामुळे पंकजाताई नाराज आहेत, असं म्हणण्याचे कारण नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना फटकारले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे हे एकटे म्हणजेच ओबीसी समाज नव्हेत. मंत्रिमंडळ विस्तारात गुलाबराव पाटील आणि मला स्थान मिळाले आहे, आम्हीदेखील ओबीसी समाजातूनच आलो आहोत. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी स्वत:ला ओबीसी समाज समजू नये, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.