बीड (रिपोर्टर) महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊले उचलावेत, भविष्यात दुर्घटना होऊ नयेत, घडल्यास कोणाचाही मृत्यू होऊ नये, त्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत शिवसंग्रामचे सर्वेसर्वा स्व. विनायक मेटे ज्या कामासाठी बीडवरून मुंबईला निघाले होते. ते मराठा आरक्षणाचे काम पुर्णत्वास जावे, हीच मेटे यांना खरी श्रध्दांजली असेल, असे विनायक मेटेंच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनी म्हटले.
त्या आज त्यांच्या निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, 14 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलवण्यात आलेल्या बैठकीसाठी मेटे साहेब जात होते. त्या दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर त्यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास शासनाने सीआयडीकडे सोपवला. त्याबद्दल कुटुंबीय आणि शिवसंग्राम परिवार आभारी आहे. असे म्हणत महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत पोहचविण्यासाठी आणि अपघातात शून्य मृत्यू व्हावेत यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, त्यासाठी शासनस्तरावर, उच्चस्तरावर दखल घेत कार्यवाही करण्याची नितांत गरज असल्याचे म्हणत ज्योतीताईंनी मेटेसाहेब ज्या कामासाठी मुंबईला जात होते त्या समस्यांची सोडवणूक होणे म्हणजे मेटे साहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल असे त्या या वेळी म्हटले.