बीड : माहिती आणि तंत्रज्ञानामुळे सध्या प्रचंड प्रमाणात गतीने कामे होत आहेत. मात्र याच युगात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्हावासियांनो, या ऑनलाईन फसवणूकीपासून साधव रहा, फसव्या ऍपव्दारे कर्ज घेवू नका, स्वत:चा आधार आणि पॅन क्रमांक कोणाशीही शेअर करू नका, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी आणि बीडच्या सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातही आता ऑनलाईन फसवणूकीच्या घटना घडत आहेत, या घटनांचा पर्दापाश करण्याबरोबरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी बीड जिल्हा पोलिसांना यश येत आहे. मात्र फसवणूक झाल्यामुळे नागरिकांना नाहकपणे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच अशी ऑनलाईन फसवणूक होणार नाही यासाठी पावलोपावली साधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी आणि बीडच्या सायबर सेलकडून करण्यात आले आहे. ऑनलाईन किंवा फसव्या ऍपव्दारे कर्ज तात्काळ मिळत आहे म्हणून ते घेवू नका, त्याबाबत शहानिशा करा, त्यांच्या अटी व शर्ती पाहूणच पुढील प्रक्रिया करावी, अधिकृत व रेटिंगनुसार मोबाईल ऍप्लीकेशनच वापरावेत, ऍप वापरतांना अनावश्यक परवानगी देवू नये, स्वत:चा आधार क्रमांक व पॅन क्रमांक कोणाशीही सामायीक करू नये, मान्यताप्राप्त बँकेकडून अथवा आरबीआय येथे नोंदणीकृत एबीएफसी यांच्याकडूनच ऑनलाईन पध्दतीने कर्ज घ्यावे, गुगल प्ले स्टोअरवरून अथवा लिंकव्दारे एखाद्या अनाधिकृत ऑनलाईन कर्ज ऍप्स आहेत जे नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी म्हणून आरबीआयव्दारे नोंदणीकृत किंवा मान्यता प्राप्त नाहीत, अशांकडून आपण कर्ज घेतले असेल व ते आपण किंवा तुमच्या जवळचे लोकांना अपमानास्पद किंवा धमकी देणारे आणि छळ करणारे कॉल करत असल्यास त्वरित नजिकच्या पोलिस ठाण्यास किंवा सायबर पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवावी, आरबीआयने नोंदणीकृत नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीची नावे व पत्ते आरबीआयच्या संकेतस्थळावर आपणास मिळू शकतात, असेही सायबर सेलने म्हटले आहे.