गेवराई, दि.24 (रिपोर्टर) शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरातील लाभार्थ्यांना रविवार, दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ड.राजेश्वर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिबीराचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 जुलै रोजी गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे पाचशेहून अधिक दिव्यांगांनी सहभाग घेतला, तज्ञ डॉक्टरांनी केलेली तपासणी आणि अवयवाचे मोजमाप घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांना रविवार, दि.28 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कृत्रिम हात व पाय या अवयवांचे वाटप केले जाणार आहे. अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून तयार केलेले अत्यंत हलके व मजबुत कृत्रिम हात व पाय दिव्यांगांना मोफत दिले जाणार आहेत. या शिबीराच्या माध्यमातून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी खर्या अर्थाने दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्यकर्म केल्याची प्रतिक्रिया शिबीरार्थींनी व्यक्त केली होती.
मोफत अवयव वाटपाच्या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेली मतदार संघाचे आमदार ड.अशोकबापू पवार, माजी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ड.राजेश्वर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोजमाप घेतलेल्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी रविवार, दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. कृत्रिम अवयव बसविल्यानंतर व्यक्ति चालू शकतो, सायकल चालवू शकतो, टेकडी चढू शकतो व सर्व दैनंदिन कामे करू शकणार आहे, त्यामुळे या सुवर्ण संधीचा लाभ सर्व दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन शिबीराचे आयोजक तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.