बिल्कीस बानो प्रकरणातील सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवा -प्रा. मोराळे
बीड (रिपोर्टर) 2002 गुजरात दंगलीतील नरसंहरातील बिल्किस बानोवर 11 नराधमानी सामूहिक बलात्कार करून तिच्या 4 वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील 14 व्यक्तींची हत्या केली. बिल्कीस जेंव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने तिथून पळ काढला. एक आदिवासी स्त्रीने तिला सहारा दिला त्यानंतर ती पोलिसांकडे गेली परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दबावामुळे शेवटी केस नोंदवली गेली.बिल्कीसने पाठपुरावा करून हिम्मतीने केस लढवली विशेष न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अजन्म कारावासाची शिक्षा देऊन आरोपीला जेलमध्ये पाठवले परंतु गुजरात सरकारने विशेष अधिकारात त्यांना जेलमधून सोडले ही घटना अतिशय निंदनीय असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारीआहे. या सर्व आरोपीला पुन्हा जेलमध्ये पाठवा अशी मागणी महिला अत्याचार कृती समितीच्या वतीने प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना केली आहे.
11 आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिची मुलगी व कुटुंबातील 14 जणांना ठार मारले हे भयंकर हत्याकांड आहे. न्यायालयाने शिक्षा देताना वारंवार या प्रकरणातील अमानुषता निकालात नमूद केली आहे. बलात्कार व हत्या प्रकरणात माफी देऊ नये असे ग्रह खात्याने स्पष्ट सांगूनही ही माफी दिली गेली आहे. खरंतर हे आरोपी फाशीच्या शिक्षेलाच पात्र आहेत परंतु शेवटी अजन्म कारावासाची शिक्षा दिली गेली. एकीकडे भाजपा बलात्कार प्रकरणी फाशीच्या शिक्षेचे समर्थन करीत आहे. दुसरीकडे मात्र न्यायालयाने दोषी ठरवून अजन्म कारावासाची शिक्षा दिलेल्या आरोपींना सोडून देत आहे. स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात माननीय मोदीजींनी नारीच्या सन्मानाची भाषा वापरली मात्र त्याच दिवशी त्यांच्या स्वतःच्या गृहराज्यात भाजपाच्या मुख्यमंत्री महोदयांनी 11 आरोपीला सोडून दिले हा प्रचंड विरोधाभास आहे.
या घटनेचा महिला अत्याचार विरोधी कृती समिती, मुस्लिम महिला फ्रंट, समाजवादी महिला सभा, ग्रामीण युवक संघटना, किसान संघर्ष समिती, जनता दल परिवार, ओबीसी संघर्ष समिती, ऊस तोडणी मंजूर संघटना, एस सी, एस टी, व्हिजेएनटी, ओबीसी महिला संघटना, शेतकरी संघर्ष समिती धर्मनिरपेक्ष पुरोगामी संघटनांच्या वतीने धिक्कार करीत आहोत. या आंदोलनात प्रा. किस्किंदा जाधव, प्रतीक्षा बोराडे, कावेरी नागरगोजे, अंजली कुलकर्णी, शैलजा सोणके, सारिका गदळे, बुशरा काझी,संगीता दराडे, सुरेखा बडे, शाहतरीन पठाण, रफत बाजी, फरजाना बाजी, सुरेखा अडागळे, राजश्री चौरे, ज्योती वडमारे, प्रा.सूक्षला वायबसे, अनिता वडमारे सह मा. बबनराव आंधळे, देविदास चव्हाण, रिजवान पठाण, मोहन अघाव, राजेश परदेशी सह कार्यकर्ते सहभागी होते.