नवगण राजुरी (रिपोर्टर) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या रोज चिंधड्या उडताना दिसून येत असून व्यापार्यांसह सर्वसामान्यात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र उभे राहत आहे. काल शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील सराफ आपल्या दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरी परतत असताना बीड-खोकरमोहा रस्त्यावर कृषी महाविद्यालयाजवळ अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या दुचाकीवर दगडफेक करत त्यांना अडवले. या दगडफेकीत सदरील सराफ हे गंभीर जखमी झाले. याउलट त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिन्यांसह नगदी रोख रक्कम असा 9 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. सदरची घटना ही बीडपासून जवळ घडल्याने व्यापार्यांसह सर्वसामान्यात भीतीचे वातावरण निर्माण जाले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील सचीन उद्धव टाक यांचे बीड शहरात सराफाचे दुकान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सोन्या-चांदीच्या व्यवसायामध्ये काम करत आहेत. दुकानावर रोज खोकरमोहाहून येणे आणि जाणे हा त्यांचा नित्याचा भाग. हीच संधी दरोडेखोरांनी ओळखली. त्यांच्या रोजच्या येण्या-जाण्यावर पाळत ठेवली. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास टाक हे आपली दुकान बंद करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोटारसायकलवर राजुरी मार्गे खोकरमोह येथे निघाले. त्यांची गाडी शहरालगत असलेल्या नवगण राजुरी जवळील कृषी महाविद्यालया-जवळ आली असता दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी टाक यांच्या गाडीवर अंधाधूंद दगडफेक करण्यास सुरुवात केली. अचानक दगडफेक
सुरू झाल्याने टाक यांनी स्वत:ची गाडी थांबवली. त्याचवेळी एक दगड त्यांच्या डोक्याला लागला. यामध्ये ते जखमी झाले. त्याक्षणी दबा धरून बसलेले दरोडेखोर समोर आले. त्यांच्या मोटारसायकलवरील बॅग ज्यात सोनं, चांदी आणि नगदी रोकड होती ती बॅग एका दरोहेखोराने उचलली आणि घटनास्थळावरून चारही दरोडेखोर पसार झाले. सदरील बॅगेमध्ये 9 लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम होती. ही घटना साडेसात वाजण्याच्या सुमारास घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र समोर येते. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार अज्ञात दरोडेखोरांविरोधात गु.र.नं. 319/2022 कलम 394, 341, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजपूत हे करत आहेत.