नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. येत्या १२ नोव्हेंबरला (शनिवारी) हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून दिल्लीत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप सत्ता टिकवणार की विरोधक गड उलथवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिमाचलसोबतच गुजरात विधानसभा निवडणुकांच्याही तारखा जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ एकाच राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या.हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. प्रत्येक मतदान केंद्र तळ मजल्यावरच असेल. हिमाचलमध्ये एकूण 55.07 लाख मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे.विधानसभा निवडणुका कोविड प्रोटोकॉल पाळून पार पडतील, असं आयुक्तांनी सांगितलं. नामांकन दाखल होईपर्यंत मतदार सहभागी होऊ शकतील. निवडणुकीदरम्यान सीमा सील केल्या जातील. फेक न्यूज आणि अफवांवर लक्ष देऊ नका, असं आवाहन आयुक्तांनी केलं.निवडणूक आयोगाने सांगितले की, 80 वर्षांवरील व्यक्ती, दिव्यांग किंवा कोविड बाधित मतदार मतदान केंद्रावर येऊ शकत नसतील, तर त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा आयोग उपलब्ध करून देणार आहे.