100 टक्के पीक नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना
सादर करून सरसकट मदतीची मागणी करणार – आ.लक्ष्मण पवार
गेवराई (रिपोर्टर) गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झालेली, तर यापूर्वीही अनेकवेळा विविध मंडळात 65 मिली मीटरच्या पुढे पाऊस झाल्याची नोंद असून सर्वच पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा अपडेट प्रशासकीय अहवाल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करून सरसकट मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले. तर विविध विभागाच्या सर्व अधिकार्यांनी या काळात सतर्क राहून नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान अतिवृष्टी संदर्भात आ.लक्ष्मण पवार यांनी आज दि.18 रोजी तहसिल कार्यालय येथे सर्वच विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला तहसीलदार सचिन खाडे, बांधकाम उपअभियंता भोरे साहेब, गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, नायब तहसीलदार श्रीकांत मुळे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, तालुका कृषी अधिकारी अभय वडकूते, न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सानप, अभियंता नागरगोजे, विस्तार अधिकारी राठोड, भूमिअभिलेखचे पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत विविध विभागाचा आढावा घेत संबधित अधिकारी व कर्मचार्यांना सूचना देताना आ.पवार यांनी सांगितले की, विमा भरलेल्या सर्वच शेतकर्यांनी तक्रारी कराव्या यासाठी शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी मदत करावी जेणेकरून या सर्व शेतकर्यांना मदत मिळवून देता येईल, तसेच पीक विम्याचा रँडम सर्व्हे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल सादर करावेत, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच गेल्या वर्षी प्रमाणे काही पाझर तलाव धोक्याची पातळी ओलांडत असून फुटू शकतात त्यामुळे अशी काही परिस्थिती आहे का हे तपासून बघण्यासाठी संबधित अधिकार्यांनी थेट या तलावाची पाहणी करून अहवाल द्यावा, तसेच या रोजच्या पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यापूर्वी काही उपाययोजना करण्यासाठी संबंधितांनी दक्षता घ्यावी. तर या सततच्या पावसामुळे पूर परिस्थितीची शक्यता नाकारता येत नासल्याम गोदा काठच्या नागरिकांसह संबधित विभागाच्या अधिकार्यांनी सतर्क रहावे यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर सतर्क राहून नागरीकांना मदत करा आशा सूचना ही आ.लक्ष्मण पवार यांनी बैठकीत देण्यात दिल्या. तर पीएम किसानच्या शेतकर्यांना हप्ता पडण्यासाठी अडचणी आहेत त्यासाठी आधार प्रमाणिकरणासाठी सर्व सेतू केंद्रात कॅम्पचे आयोजन गावागावात करण्यात येणार असून यासाठी आपापल्या स्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. यावेळी सचिन मोटे, दादासाहेब गिरी, विठ्ठल मोटे, नगरसेवक अजित कानगुडे, ब्रह्मदेव धुरंधरे, बाबा वाघमारे, प्रा.येळापुरे, बाबुराव खाडे यांच्यासह अधिकारी,कर्मचारी व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.