मुंबई (रिपोर्टर) कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांवर दावा करण्याची तयारी केली असल्याचं सांगितल्यानंतर आता आणखी एक विधान केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं असून सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत असा दावा केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून महाराष्ट्र असा-तसा वाटला का? अशा शब्दांत सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे संजय राऊत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, महाराष्ट्र लेचापेचा वाटलाय का? 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं, आताही आम्ही रक्त सांडायला तयार आहोत, जेलमध्ये जायला तयार आहोत, हा इशारा नाही तर धमकी समजा. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा, असे म्हणत राऊतांनी इशाराच दिला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीमा भागातले एकही गाव जाणार नाहीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल दावा केल्यानंतर कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देत सोलापूर आणि अक्कलकोटमधील गावांवरही हक्क दाखवल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. अजित पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांच्या विधानाचा धिक्कार करत ते काय महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना सांगलीतील जत तालुक्यासंबंधी त्यांनी विधान केलं. आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांसदर्भात विधान केलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
तर दुसरीकडे शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा, असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ते म्हणतात, हा इशारा नाही, धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा, हे घेऊ ते घेऊ, हे थांबवा, आज आम्ही शांत आणि संयमी आहोत. शिंदे सरकार गुडघ्यावर बसेल तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी राहील. शिंदे गटातील 40 आमदार स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडत आहेत, असे म्हणाले होते, आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठे शेण खात आहे तुमचा स्वाभिमान, एक मुख्यमंत्री गाव घेत आहे, एक उद्योग घेत आहे अन् षंडासारखे बसला आहात तुम्ही, असे राऊतांनी म्हटले.