गेवराई (रिपोर्टर) गेवराई मतदार संघातील ज्या नागरिकांना एक हजार रुपयात एक ब्रास वाळू खरेदी करायची असेल त्यांनी थेट गेवराई तहसील कार्यालयात मागणी अर्ज करावा, असे आवाहन आमदार लक्ष्मण पवार व तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
आज रविवार ता. 29 रोजी तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत केले आहे. दरम्यान, टेंडर धारकांनी मान्य केल्या प्रमाणे एक हजार रुपयांत एक ब्रास वाळू भरून देणे बंधनकारक केलेले आहे. मात्र, काही टेंडर धारक मुजोरी व मनमानी करत असल्याचे निदर्शनास आल्याने, संबंधितांना आज आ.लक्ष्मण पवार यांच्या समक्ष तहसीलदार सचिन खाडे यांनी कडक शब्दात समज दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाळू घाट सुरू असतानाही नागरिकांना वाढीव दरात वाळू विक्री सुरू होती. या विषयावर आमदार पवार यांनी मतदारसंघातील नागरिकांना कमी दरात वाळू मिळावी यासाठी आ. पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर, प्रशासनाने लेखी आदेश दिल्यानंतरही ठेकेदाराकडून वाळू दर कमी होत नसल्याने आ. पवार यांनी रविवारी गेवराई तहसिल कार्यालयात तहसीलदार खाडे व वाळू ठेकेदार यांची बैठक घेऊन नागरिकांना कमी दरात वाळू मिळावी यासाठी आदेश दिले. नागरिकांनी आता कमी दरात वाळू मिळवण्यासाठी तहसिल कार्यालयात मागणी अर्ज करावा असे आवाहन आ.लक्ष्मण पवार व तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या वाळू घाटावरून वाळू कमी दरात मिळावी यासाठी उपोषण केल्यानंतर ही टेंडर धारक व प्रशासनाकडून नियमाप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी आज थेट गेवराई तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांच्या उपस्थितीत टेंडर धारकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी उपस्थित टेंडर धारक व प्रशासनाला दर कमी करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत. या बैठकीला तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सर्व टेंडर धारक व गोदापात्र परिसरातील सर्व तलाठी मंडळाधिकारी, कर्मचारी व पत्रकार व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.