मुंबई (रिपोर्टर) उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात असताना सुषमा अंधारे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या भंडारा जिल्ह्यात सभेला संबोधित करत होत्या.
एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसर्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली, असे मोठे विधान सुषमा अंधारे यांनी केले. मी बीडमधील आहे, तर त्यांना वाटतं ते मला हैराण करू शकतील. मात्र ते सध्या भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.