Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा कडकडीत बंद ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त पोलीसांची संयमाची भूमिका

जिल्हा कडकडीत बंद ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त पोलीसांची संयमाची भूमिका


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. आज बीड शहरासह जिल्हाभरातील शहरे व ग्रामीण भाग कडकडीत बंद होते. शहराच्या ठिकाणी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर निघालेल्या नागरिकांची पोलीस चौकशी करून त्यांना जाण्यास परवानगी देत आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार पोलीसांची नरमाईची भूमिका दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले आहे. मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. आज सकाळी सर्वत्र कडकडीत बंद दिसून आला. भाजीपाला आणि दूध विक्रेत्यांना दोन तासांचा अवधी देण्यात आलेला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांची चौकशी करून त्यांना सोडून द्यावे व विनाकारण नागरिकांना मारहाण करू नये, अशा सूचना काल जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर पोलीसांची भूमिका नरमाईची दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बार्शी नाका, बशीरगंज, जालना रोड, आंबेडकर पुतळा यासह अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बीड शहरासह तालुक्यातील शहरांसह मोठ्या गावांमध्ये लॉकडाऊन कडकडीत पाळण्यात आलेला आहे.

केजचे तहसीलदार रस्त्यावर
लॉकडाऊनची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी नगरपंचायत कर्मचारी हे सर्व रस्त्यावर दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक शहराच्या ठिकाणी येत असल्याने त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात येऊ लागले आहे. त्याचबरोबर तहसीलदार दुलाजी मेंडके हे सकाळपासून ठिकठिकाणी फिरून अंमलबजावणी होतेय की नाही याची पाहणी करत होते.

गेवराई शहर कडकडीत बंद
गेवराई शहरातील व्यापार्‍यांचा आणि लोकप्रतिनिधींचा लॉकडाऊनला विरोध असला तरी शहर मात्र आज कडकडीत बंद दिसून आले. शहरासह ग्रामीण भागातील मोठे गावेही बंद होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

पोलीस कर्मचार्‍यांना कुटे ग्रुपकडून खिचडीचे वाटप
आजपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या पोलीस कर्मचार्‍यांसाठी सकाळचा नाश्ता कुटे ग्रुपच्या वतीने वाटप करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!