बीड (रिपोर्टर) अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रा.पं. निवडणुकीपैकी एक असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीप्रश्न ऐरणीवर आलं असून या प्रश्नाने प्रास्थापित उमेदवारांसह सर्वच उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवलं आहे. 13 सदस्यीय ग्रा.पं.निवडणुकीसाठी सरपंच पदावर दावा करण्याहेतू 3 पॅनलचे तर 2 अपक्ष उमेदवारांनी आपली ताकद लावल्याचे दिसून येत असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पुष्पा सुधीर नरवडे व सुलभा मनोज पाटील यांच्यात काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे. पाटील यांच्या उमेदवारांना गावकरी गेल्या 25 वर्षांचा हिशोब मागत आहे तर गेल्या पंचवार्षिकमध्ये सुनील पाटलांच्या नेतृत्वात असलेल्या उमेदवारांना पाणीप्रश्न सतावत आहे.
ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये तीन पॅनल मोठ्या ताकतीने निवडणूक लढवत आहे. यामध्ये गेले 25 ते 30 वर्षे ग्रा.पं.च्या सत्तेत राहिलेले सतीश पाटील यांचे एक, त्यांचे बंधू सुनील पाटील यांचे एक पॅनल आणि नव्याने ग्रा.पं.च्या निवडणूक रिंगणात उतरलेले संजय नरवडे यांचे पॅनल आपले भवितव्य अजमावत आहेत. संजय नरवडे यांच्या पाठिशी थेट माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ताकत उभी असून अन्य दोन जाधव व सातपुते या अपक्ष उमेदवारांनीही डोअर टू डोअर प्रचार सुरू ठेवल्याने मताच्या विभागणीची धास्ती प्रस्थापीत आणि मातब्बरांना वाटत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो गावचा विकास करील, जो पाणी पाजेल त्यालाच मतदान देऊ, असे गावकरी उघडपणे उमेदवारांना सांगत असतानाच अठरापगड जाती-जमाती गावात असल्याने मतांची गोळाबेरीज करता करता प्रस्थापितांच्या तोंडाला फेस आल्याचेही दिसून येत आहे. अशा स्थितीत दोन भावांच्या हातात गावकर्यांनी सत्ता देऊन पाहिली. आता गेवराई विधानसभा मतदारसंघासारखे दोन पाटलांच्या मध्ये नरवडेंना संधी गावकरी देणार का? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. पिंपळनेर हे गाव सुशिक्षीत-सुजान असल्याने व गेल्या तीस वर्षांच्या कालखंडात विकासापासून कोसो दूर राहिल्याने ही निवडणूक पिंपळनेरकरांनीच हातात घेतल्याचे पाहून उमेदवार आपली ताकत लावत असले तरी या निवडणुकीत मतांची विभागणी महत्वपुर्ण ठरणार आहे.