गेवराई (रिपोर्टर) मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांना ठाणेप्रमुख रविंद्र पेलगुलवार यांनी मतदान केंद्र आवारातच अमानुषपणे मारहाण केली. विनाकारण मारहाण होत असताना त्यांची बहिण मारू नका असे म्हणण्यासाठी आली असता तिलाही मारहाण झाल्याची घटना 18 डिसेंबर रोजी तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलिसात पी.टी.चव्हाण आणि इतरांविरूध्द खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेवून कायद्याचा दुरूपयोग करणार्या ठाणेप्रमुख रविंद्र पेलगुलवार यांची चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नवनिर्वाचीत सरपंचासह सदस्यांनी केली आहे. केकतपांगरी येथे मतदानासाठी गेलेल्या माजी जि.प.सदस्य पी.टी.चव्हाण यांना पोलिस निरीक्षक पेलगुलवार यांनी जाणिवपूर्वक मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेली चव्हाण यांची बहिण यांना सुध्दा मारहाण झाली. याप्रकरणी पोलिस अधिकार्याविरोधात वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी केकतपांगरीच्या सरपंचासह सदस्यांनी केली आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाने चव्हाण यांच्यावरच चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.