बीड (रिपोर्टर) शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटेंचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर राज्यात अपघाताची मालिका पहावयास मिळते. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रातील चार आमदारांच्या गाड्यांना अपघात झाल्याने रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आ. योगेश कदम, आ. जयकुमार गोरे, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आ. बच्चू कडू हे या अपघातात जखमी झाले. रस्त्यावर होणारे अपघात पाहता सुरक्षा अभियामानाची आणि रस्त्यावर वाहन चालविण्याबाबतचे मोठ्या प्रमाणावर जनजागरण होणे अपेक्षित असताना बीडचे आरटीओ मात्र रस्ता सुरक्षा अभियान केवळ कागदावर घेत आहेत.
गेल्या महिनाभराच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात चार आमदारांच्या गाड्यांना अपघात झाला. यामध्ये भाजपाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला फलटण शहरानजीक अपघात झाला होता. फॉर्च्यूनर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत पन्नास फुट कोसळली. यात गोरेंसह चार जण जखमी झाले. सदरची घटना 4 डिसेंबरला घडली. त्यानंतर 4 जानेवारीला परळीमध्ये राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ते जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोन दिवसाने 6 जानेवारीला शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला. त्यांच्या कारला टँकरने धडक दिली. यात ते किरकोळ जखमी झाले. तर आज आ. बच्चू कडू हे एकाक कार्यक्रमाला जात असताना त्यांना दुचाकीस्वाराने उडवले. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. थेट आमदारच अपघातामध्ये गंभीर जखमी होत असल्याने राज्यात रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येते. अशा वेळी आरटीओ कार्यालयाने रस्ता सुरक्षा अभियान राबवताना लोकांची जनजागृती व्हावी याकडे लक्ष द्यायला हवे. परंतु बीडचे आरटीओ हे केवळ वसुलीबाजीत आघाडीवर असतात. ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर अथवा अन्य वाहनांना रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे आहे. तशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा केल्यानंतरही आरटीओकडून ती पुर्णत्वास नेली गेली नाही. असे अनेक उदाहरणे या ठिकाणी देता येतील. रस्ता सुरक्षा अभियान आणि जनजागृती होणे नितांत गरजेचे आहे मात्र आरटीओंना त्यात वेळ नाही.