शिरूर कासार (रिपोर्टर)- आज रविवार दि.12 रोजी तालुक्यात इयत्ता आठवी व पाचवी शिष्यवृती परीक्षा चालू झाली असून फॉर्म भरतांना शिक्षकांच्या चुकीमुळे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याला पाचवीच्या कोट्यात फार्म भरल्याने आज त्या विद्यार्थ्याला पाचवीचे हॉल तिकेट आल्याने गफलत होऊन तो विद्यार्थी पाचवीच्या सेंटरवर पोहचला. मात्र तिथे त्याला प्रवेश नकरण्यात आला. तर आठवीच्या सेंटरवर त्याचा नंबर नसल्याने परीक्षा देण्यास मजावं करण्यात आल्याचा प्रकार शिरूर कासार येथे घडला.
आज तालुक्यात सात केंद्रावर परीक्षा चालू असून शहरांतल्या आयडियल इंग्लिश स्कुल कालिकादेवी, रायमोहा येथील जालिंदर विद्यालय येथे इयत्ता आठवी तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शिरूर, जि प मा. खोकरमोहा, दहिवंडी येथील महात्माफुले तर निमगाव येथील निगमानंद विद्यालय येथे इयत्ता पाचवी शिष्यवृती परीक्षा सुरु झाली असून इयत्ता आठवीसाठी 623 विद्यार्थी तर पाचवीसाठी 660 विद्यार्थी शिष्यवृती परीक्षा देत असून एकूण सात केंद्रावर मिळून 1283 विद्यार्थी शिष्यवृती पात्रातेसाठी परीक्षा देत आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांनी चुकीचा फार्म भरल्यामुळे इयत्ता आठवी इयत्तेत शिकणार्या अजित लंकेश केदार या वारणी येथील केशवराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यावर परीक्षा न देताच माघारी जाण्याची वेळ आली होती.मात्र काही शिक्षक प्रेमिच्या सजगतेमुळे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून त्याला इयत्ता आठवी शिष्यवृती या परीक्षेसाठी काही अटी व शर्थीवर बसण्यास परवानगी देण्यात आली. जर असे झाले नसते तर या विद्यार्थ्याने वर्षभर घेतलेल्या मेहनतीवर आपल्याच शिक्षकांमुळे पाणी फिरवण्याची वेळ ओढावली असती हे मात्र नक्की. शिष्यवृती परीक्षेसाठी ऑनलाईन फार्म भरले जातात यावेळी त्याचा वर्ग त्याची जन्मतारीख या नुसार वयोगट ग्राह्य धरून फार्म भरले जातात. मात्र फार्म भरतांना शिक्षकांच्या चुकीने इयत्ता आठवी ऐवजी पाचवी टाकल्याने त्या विद्यार्थ्यांचे वय जास्त असूनही प्रवेश पत्र शिक्षण विभागाने जारी कसे केले. आणि तो जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर हजर झाला.मात्र त्याला परीक्षा केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले. ही बाब काही शिक्षण प्रेमीच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना भ्रमणध्वनी द्वारे सांगून त्या विद्यार्थ्याला परीक्षा देऊ देण्याची विंनती केली. त्यांनी ही काही अटी शर्थीवर परवानगी दिली मात्र आपली चूक लक्षात आल्याने त्या संबंधित शिक्षकांने त्या विद्यार्थ्याला गुपचूप घरी जाण्यास सांगितले.व त्यांना परवानगी मिळाल्याचे कळल्यावर त्याला सापडवण्यासाठी शिक्षकांची एकच पळापळ झाली. यावरून या शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यापरी काय आत्मीयता आहे हे कळून आले. शिक्षकांच्या चुकीमुळे मात्र प्रशासनाला नाहक लोकांच्या आक्रमकतेला तोंड देण्याची वेळ आली होती.
टिप :- बातमीतील फोटो प्रतिकात्मक आहे.