बीड, (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेत कोट्यावधीचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांनी ‘जल है तो कल है’ म्हणत मोर्चा काढला होता. याप्रकरणी बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे सोडुन मोर्चा काढणार्या बाळा बांगर यांच्या संबंधीत असलेल्या संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थेच्या चौकशीचे आदेश देणे अपेक्षीत, मात्र बाळा बांगर यांनाच टार्गेट करून त्रास दिला जातोय. त्यामुळे आता जलजीवन योजनेच्या कामात भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्या सीईओ पवार यांची चौकशी व्हावी अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी केली. चौकशी झाली नाही तर आंदोलन करण्याचा ईशाराही त्यांनी दिला. ते राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेला युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, के.के. वडमारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना महेबुब शेख म्हणाले की, बाळा बांगर यांनी बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाभर मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा काढु नका असे सीईओंनी बाळा बांगर यांना सांगितले होते. शिवाय त्यांना धमकावण्याचेही महेबुब शेख म्हणाले. ज्यादिवशी मोर्चा निघाला त्यादिवशी बाळा बांगर यांच्या संबंधित असलेल्या शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी काढले. सीईओ आजही निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना हाताशी धरून जलजीवन योजेनेचे कामे करत आहेत. अनेक गावातील टेंडरमध्ये अनियमितता आहे.आपल्या जवळच्यांना टेंडर देण्यासाठी ही अनियमितता केली असल्याचा आरोपही महेबुब शेख यांनी केला आहे. सीईओ हे प्रशासकीय अधिकारी आहे, मात्र त्यांना कशाची मस्ती चढली, त्यांची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरविल्याशिवाय राहणार नसल्याचेही महेबुब शेख म्हणाले. जलजीवन योजनेत भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्या सीईओ यांच्यावर कारवाईसाठी आमदारांना कागदपत्रे देवुन लक्षवेधी लावणार असल्याचेही महेबुब शेख म्हणाले.