बीड (रिपोर्टर) सामाजिक कार्याचे बाळकडु मिळालेले शुभम धूत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने त्यांना सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काल परळी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात शुभम धूत यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या वेळी या सन्मानाचे ऋण फेडणार नाही तर ते सामावून ठेवत अधिक अधिक समाजकार्य करण्यासाठी स्वत:ला झोकून देणार असल्याचा शब्द शुभम धूत यांनी उपस्थित मान्यवरांना दिला.
राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत कार्य करणारे दिलीप धूत यांचे चिरंजीव शुभम धूत यांना परळी माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शुभम धूत हे स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून देतात. गोरगरिबांच्या अडीनडीला धावून जातात. कोरोनामध्ये केलेले त्यांचे काम कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. वृक्षारोपण, रक्तदान यासह दिवाळी, रमजान ईद या सणांना गोररिबांची दिवाळी गोड करण्याहेतूने सढळ हाताने अन्नदान, कित्येकांना मदत त्यांच्याकडून सातत्याने केली जाते. याची दखल घेत माहेश्वरी संघटनेच्या वतीने हा पुरस्कार ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माहेश्वरी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक सारडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरीचे माजी अध्यक्ष मधुसुदन गांधी, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अर्थमंत्री दिनेश सोमाणी, परळीचे माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, संतोष सोहनी, हनुमानदास मंत्री, अमर सारडा, पंकज तापडिया, तपन मोदानी, ऐश्वर्या तापडिया या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना देण्यात आला. पुरस्काराचे ऋण मला फेडायचे नाही तर ते साठवायचे आहेत. आजपर्यंत मिळालेल्या प्रत्येक पुरस्कार, सन्मान हा पुढील काळात दुप्पट वेगाने काम करण्यासाठी मला अधिक उर्जा देतो. समाजकार्य हेच ध्येय ठेवून समाजकार्य करायचे आहे, असे शुभम धूत यांनी म्हटले.