माजलगाव (रिपोर्टर)- येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काल भरदिवसा सहा हल्लेखोरांनी अडवून रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात शेजुळ हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शेजुळ यांच्या फिर्यादीवरून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेजुळ यांच्या दोन्ही पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक असे की, माजलगावचे भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ हे दररोज प्रमाणे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पान खाण्यासाठी आले होते. त्याठिकाणाहून ते घरी परतत असताना शाहूनगर येथील मोरेश्वर विद्यालयाजवळ त्यांच्या पाठलाग करत असलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर रॉडने हल्ला केला. पाच ते सहा जणांनी त्यांच्या हातापायासह डोक्यावर रॉडने हल्ला केल्यामुळे ते यात गंभीर जखमी झाले. तेथील आरडाओरड ऐकल्यानंतर काही नागरिकांनी तिकडे धाव घेतली असता हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. शेजुळ यांना तात्काळ उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शेजुळ हे गंभीर जखमी असून त्यांच्या डाव्या पायाला व उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले तर दोन्ही हातांसह डोक्याला गंभीर मार लागलेला आहे. या प्रकरणी शेजुळ यांनी माजलगाव शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून आ. प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगलबाई प्रकाश सोळंके, टवाणी यांच्या संबंधित संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर आणला म्हणून त्यांनी गुंडांकरवी आपल्यावर हल्ला केला अशा आशयाची तक्रार दिल्याने आ. सोळंकेंसह त्यांच्या पत्नी व रामेश्वर टवाणींसह अन्य पाच ते सहा जणांविरोधात माजलगाव पोलिसात कलम 307, 147, 148, 149, 120 बी भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.