वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या कॉरिडॉरसह विविध विषयी
बैठक घेऊन निर्णय घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई (रिपोर्टर): केंदीय पर्यटन मंत्रालयाच्या ’प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी आ.धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार पर्यटन संचालनलयामार्फत श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ जिल्हा बीड या ज्योतिर्लिंग स्थळ विकासाचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; असे उत्तर पर्यटन मंत्रालयाने आ. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर दिले आहे.
परळी येथील श्री वैद्यनाथ हे शंकराचा 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 वे ज्योतिर्लिंग असून इथे येणार्या भाविकांच्या संख्येच्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंढरपूरच्या धर्तीवर परळी वैद्यनाथ कॉरिडॉर करण्यास 500 कोटी रुपये निधी द्यावा, तसेच वैद्यनाथांसह राज्यातील सर्व पाचही ज्योतिर्लिंग स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्रिय पर्यटन विभागाच्या प्रसाद या योजनेत समावेश करावा, अशी मागणी लक्षवेधी सुचनेद्वारे धनंजय मुंडे यांनी केली होती.
वैद्यनाथ मंदिर येथे अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी 10 कोटी रुपये, तसेच वन विभागाच्या उपलब्ध जागेत वन उद्यान विकसित करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात 6 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती.
विधानसभेत आ. धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधीवर देण्यात आलेल्या लेखी उत्तरात वैद्यनाथ तिर्थक्षेत्राचा केंद्रीय पर्यटन विभागच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून प्रस्ताव मागवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी ज्योतिर्लिंग स्थळांच्या विकासाची उपस्थित केलेली लक्षवेधी अत्यंत महत्वाची असून, याद्वारे करण्यात आलेल्या सर्वच मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी बोलताना म्हटले आहे.