अनुदान वितरण करण्यास सुरुवात!; खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
बीड (रिपोर्टर) अवकाळीची मदत तर दूरच, बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 410 कोटी अद्याप मिळाले नाहीत असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी विधानसभा सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकर्यांच्या खात्यावर अतिवृष्टी काळातील मदतीचे वितरण सुरू झाले आहे. खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जे नुकसान केले, त्या नुकसानीच्या भरपाई पोटी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास सादर केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे शासनाने 410 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र याला चार महिने उलटले, दिवाळी तर सोडाच पण आता पाडवा आला तरी त्या मदतीचे अद्याप वितरण नाही, कधी सॉफ्टवेअर तर कधी डेटा तर कधी काही अडचणी सांगितल्या जातात, यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी सरकारला धारेवर धरले होते. यावेळी अवकाळी पावसामुळे सध्या जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तर करूच मात्र मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची रक्कम तातडीने वितरित करण्यात येईल, असे आश्वासन सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आले होते; त्यानंतर सूत्रे तातडीने हलली व आज लगेचच बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.