Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडसोयाबीनच्या महाबीज बियाणांचा कृत्रिम तुटवडा

सोयाबीनच्या महाबीज बियाणांचा कृत्रिम तुटवडा


साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी
जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार
बीड (रिपोर्टर):- पुर्व मौसमी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदारांकडे गर्दी करून ओत. नामांकित कंपनीच्या बियाणांचा बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकर्‍यांची लुट केली जाते. महाबीजच्या सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण झाला असून काही दुकानदार या बियाणांची चढ्या भावाने विक्री करत असल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते, मात्र गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी बहुतांश शेतकर्‍यांनी कापसाऐवजी सोयाबीन लागवडीकडे कल वळविला. पुर्वमौसमी पाऊस पडल्यानंतर शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात कृषी दुकानदारांकडे गर्दी करून आहेत. महाबीजच्या सोयाबीन बियाणाला सर्वाधिक मागणी असल्याने या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला असून काही दुकानदारांनी कृत्रिम टंचाई दाखवत चढ्या भावाने बियाणांची विक्री सुरू केली आहे. इतर कंपनीच्या बियाणात आणि महाबीजच्या बियाणात १ हजार रुपयांचा फरक आहे. सोयाबीन बियाणांचे अधिकृत ४२ विक्रेते आहेत. काळ्या बाजाराबाबत विक्रेत्यांनी आरोप फेटाळले असले तरी शेतकर्‍यांनी मात्र काळाबाजार होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची लागवड लक्षात घेता सर्व कंपन्यांकडून ७० क्विंटल बियाणे मागविले आहेत. यात महाबीजचे सोयाबीन बियाणे ११ हजार ३०० क्विंटल जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

काळाबाजार होत असेल तर तक्रार करा
मागणीपेक्षा महाबीज सोयाबीन बियाणे पुरवठा कमी असल्यामुळे काही प्रमाणात तुटवडा भासत आहे. मात्र शेतकर्‍यांनी महाबीज सोयाबीन बियाणे सोबत इतर बियाणांचा वापर करावा, असे जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर साळवे यांनी सांगितले आहे. तसेच चढ्या दराने कोणी खत-बियाणांची विक्री करत असेल तर त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा. तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल. अकरा तालुक्यांच्या ठिकाणी ११ पथके नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विक्री वाढल्याने सोयाबीन बियाणे शिल्लक नाही
बीड जिल्ह्यात यावर्षी महाबीज सोयाबीन बियाणे ३५ हजार क्विंटलची मागणी केली होती मात्र पुरवठा अवघा ११०७५ क्विंटल झाला आहे. यात पिक पाणी प्रात्यक्षिक व वितरकांकडून ७० टक्के सोयाबीनची विक्री केली गेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनचे बियाणे शिल्लक नाही. आमच्याकडे देखील शेतकर्‍यांच्या अनेक तक्रार आल्या आहेत. मात्र पुरवठा कमी झाल्यामुळे बियाणे उपलब्ध करून देणे जिकरीचे होत आहे. याला कृत्रिम तुटवडा म्हणता येणार नाही मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे ४० टक्के सोयाबीन खराब झाले असल्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गिरी यांनी सागितले आहे.

२०:२०:० रासायनिक खत चढ्या भावाने
काही नामांकित बियाणांसह २०:२०:०३, १०:२६:२६ या रासायनिक खताचाही कृत्रिम तुटवडा निर्माण करत चढ्या भावाने खताची विक्री होत असल्याचे अनेक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तसेच अजित आणि कावेरी या कंपनीच्या बियाणांबाबतही तसच असून या कंपनीचे कापसाचे बियाणे वाढीव दराने विक्री केले जात असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!