आपल्याला कुणी स्पर्धक असूच नये असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती स्पर्धा कोणतीही असो. राजकारण हा एक व्यवसाय झाल्यासारखा झाला. राजकारणात आपणच पुढे असलो पाहिजे असं प्रत्येक नेत्याला वाटत असतं. लोकशाहीच्या आणि तत्वाच्या किती ही गप्पा मारल्या जात असल्या तरी ह्या गप्पा फक्त बोलण्या पुरत्या उरल्या. प्रत्यक्षात विचार आचारणात आणणारे नेते किती? भाजपा हा आज सगळ्यात बडा पक्ष, या पक्षाचे प्राबल्य 2014 पासून वाढले. आपला हा आलेख कधीच कमी होवू नये असं भाजपाला वाटू लागलं. काँग्रेस पक्ष किती भ्रष्ट आणि किती मुर्ख आहे हे भाजपावाले नेहमीच सांगत असतात. आपणच तेवढेच चांगले हे देखील सांगायला ते विसरत नाही म्हणजे हा किती मोठा विनोद म्हणायचा. लोकांना जास्त काळ मुर्खात काढता येत नसतं. तेच, ते मुद्दे घेवून आणखी किती वर्ष बनवा बनवी करणार? 2024 च्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तेला दहा वर्ष पुर्ण होतील. हा दहा वर्षाचा कालखंड मोठा आहे. इतके महिने द्या, त्यात बदल घडवून आणतो. नाही बदल घडवून आणला तर …. करीन असं देखील भाजपाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेलं आहे. भ्रष्टाचार संपवला जाईल, महागाई कमी केली जाईल. वर्षाला दोन कोटी तरुणांच्या हाती काम दिले जाईल. इतके मोठे आश्वासने मोदी यांच्या कार्यकाळातील आहेत. आता ह्या आश्वासनाची त्यांना आठवण होत आहे की, नाही त्यांनाच ठावूक, ह्या सर्व गोष्टी एखाद्याने उकरुन काढल्या तर त्याला देशद्रोही किंवा इतर काही तरी म्हणुन त्याची अवहेलना केली जाते. इतक्याने नाही भागलं तर मग एखादी तपासी संस्था मागे लावून दिली जाते, त्यामुळे विरोधात बोलणारा जास्त बोलतच नाही, अशा हुकूमशाही राजकीय पर्वाला गेल्या नऊ वर्षापासून सुरुवात झाली. हुकूमशाही वृत्ती भारतीय लोकशाहीला मान्य नाही. ती जास्त दिवस टिकू शकत नाही.
पप्पू म्हणुन टिंगल
राहूल गांधी यांची जितकी होईल तितकी टिंगल, टवाळी करण्यात आली. राहूल हे पप्पू आहेत. त्यांना राजकारणातलं काही कळत नाही. त्यांनी पक्षाची वाट लावली असा प्रचार भाजपाने केला. त्यांच्या भक्तांनी सुध्दा राहूल यांना सोशल मीडीयातून नेहमीच टार्गेट करण्याचं काम केले. 2014 च्या निवडणुकीत भाजपाला ‘अतिबहुमत’ मिळालं हे खरं आहे. देशातील जनतेला बदल हवा होता. काँग्रेसच्या बाबतीत एक राग लोकात होता. तो राग लोकांनी काढून भाजपाला मतांच्या माध्यमातून दान दिलं गेलं. काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं हा प्रश्न आज भाजपावाले विचारत आहेत, म्हणजे त्यांच्या बुध्दीची कीवच करावी लागेल. काँग्रेसला काही करता आलं नाही हा मुद्दा जर खरा मानला तर आज जे काही आहे ते सगळं कुणाच्या काळातील आहे? याचं आत्मचिंतन भाजपा का करत नाही. भाजपाच्या काळात नेमकं काय झालं हे सांगता येईल का? भाजपाने महागाई वाढवून ठेवली. जाती, धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला? 2014 आणि 2023 या काळात तीन पटीने महागाई वाढली. पाचशे रुपयाला मिळणारा गॅस आज अकराशे रुपयाला मिळू लागला. पेट्रोल, डिझेल शंभर रुपयापेक्षा जास्त झाले. हे सर्व महागाईचे मुद्दे संसदेत राहूल गांधी मांडू लागले. तसेच बाहेरही ते यावर बोलत राहिले. महागाईवर राहूल जास्त बोलतात, म्हणुन त्यांना पप्पू ही पदवी देवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यांची उंची कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे भाजपाच्या लक्षात आल्याने भाजपावाले गांधी यांना राजकारणातून नामोहरम करण्यासाठी पेटून उठलेे.
इतर पक्ष तितकं बोलत नाहीत
विरोधक कुणी ही असला तरी त्यांनी आपलं काम प्रमाणीकपणे केले पाहिजे. देशात भाजपा नंतर मोठा पक्ष हा काँग्रेसच आहे. काँग्रेसच्या जागा कमी असल्या तरी मतांची टक्केवारी आणि देशातील प्रत्येक गावात एक तरी काँग्रेसचा कार्यकर्ता या पक्षाचा आहे. त्यामुळे काँग्रेसचा विस्तार मोठाच आहे हे मान्य करावं लागेल. दक्षिण भारतात भाजपाला अजुन प्रवेश करता आला पाहिजे, पण त्या ठिकाणी काही प्रमाणात काँग्रेस आहे हे मान्य करावं लागेल. प्रादेशीक पक्षाचं सोयीचं राजकारण आहे. काही ठरावीक प्रादेशीक पक्षच भाजपाला विरोध करत असतात. इतरांना काही देणं ना घेणं आहे. काहींनी कारवाईच्या भीतीने आपल्या नांग्या टाकून दिल्या. दिल्लीकडे बघणंच नको अशी भुमिका प्रादेशीक पक्ष घेत असतात. ममता बॅनर्जी ह्या आक्रमक असतात, पण त्यांच्या पक्षाची मर्यादा एकाच राज्यापुरती आहे. समाजवादी पक्ष ही उत्तरप्रदेशमध्ये मोठा असतांना त्या पक्षाचे नेते भाजपाला तितका विरोध करतांना दिसत नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावर बैठका घेवून फायदा नसतो. प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम करावे लागते. सत्ताधार्यांच्या ज्या काही चुका आहेत. त्या जनतेत जावून दाखवून द्याव्या लागतात. तेव्हा परिवर्तनला सुरुवात होत असते. असं न करता. काही छोटे पक्ष चर्चेत राहण्यासाठी बैठका घेेवून एकमुठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला तितका अर्थ नाही. अशा बैठक आज पर्यंत अनेक वेळा झालेल्या आहेत. त्यातून काहीच साध्य झालेलं नाही. जो पर्यंत तुम्ह्ी काही ठोस करुन दाखवत नाही. तो पर्यंत यश मिळणार नाही. कॉग्रेसला बाहेर ठेवून इतर प्रादेशीक पक्षांची ताकद चांगली निर्माण होईल असं वाटत नाही. कारण समोरच्या बलाढ्य पक्षाला टक्कर देण्याइतकी आपली ताकद तितकी असली पाहिजे, याचे ही भान असले पाहिजे.
राहूल यांच्यावर कारवाई
राहूल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. ‘सगळ्या चोराचं नाव मोदीच कसं’ असं ते वक्तव्य होतं. त्यावर कारवाई झाली होती. हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. सुरत कोर्टाने राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच राहूल याची खासदारकी रद्द करण्यात आली. राहूल यांच्यावर तात्काळ कारवाई झाली याचं मोठं आश्चर्य वाटतं. भाजपाचे वादग्रस्त नेते दोन समाजात तेढ निर्माण होईल असं बोलत असतात. त्यांच्यावर कधी कारवाई करण्याची तसदी भाजपाने घेतली नाही. भाजपा,शिंदे सोबत असलेल्या आ. बच्चु कडू यांना कोर्टाने एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर अजुन कारवाई झाली नाही. न्याय सर्वांना समान असला पाहिजे ना? ‘आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कारर्ट’ असं म्हणावं लागेल. राहूल यांच्या वर कारवाई केल्याने देशातील कॉग्रेंसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राहूल यांच्या कारवाई बाबत काही राजकीय नेत्यांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या. जे काँग्रेसचे विरोधक आहेत. त्यांना हा प्रकार अवडला नाही. राजकीय मतभेद असावे पण असा व्यवहार असू नये असं काहींनी म्हटलं आहे. भाजपावाले राहूल त्यांच्या कारवाईचं समर्थन करतात हा भाग वेगळा. त्यांना तर समर्थन करावाचं लागेल. ते न्यायाच्या दिशेने बोट दाखवून मोकळे झाले. राहूलच नव्हे सोनिया गांधी, आणि प्रियंका गांधी, त्याचे पती यांना देखील अनेक वेळा परेशान करण्याचं काम करण्यात आले. मध्यंतरी ईडीची नोटीस सोनिया गांधी यांना पाठवण्यात आली होती. त्यात काही सापडलं नाही, त्यामुळे भाजपाने राहूल यांच्याकडे मोर्चा वळवला. विधानाचं प्रकरण चार वर्षा पुर्वी आहे. त्यावर आताच निकाल येणं हा ही चमत्कार नाही का? भाजपाच्या काही खासदरांचे प्रकरण गंभीर असतांना ते तात्काळ निकाली निघत नाहीत. राहूल गांधी याचं प्रकरण चार वर्षात निकाली निघालं? कारवाई नंतर आपण भित नाही असं राहूल यांनी ठणकावून सागितलं. त्यांनी तीव्र शब्दात भाजपाला खडे बोल सुनावले. आपण कदापी माफी मागणार नाही असं रोखठोक बोलून राहूल भाजपाशी दोन हात करण्याच्या पुर्ण तयारीत आहेत.
काँग्रेसला चांगली संधी?
येणारी लोकसभा निवडणुक आपल्याला सहज जाणार नाही हे भाजपाच्या लक्षात आलेलं आहे. तरी पण भाजपा आपणच सहज निवडणुक जिंकणार अशा तोर्यात आहे. तिसर्या वेळी मोदी हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. मोदी हे विकासापेक्षा भावनीक मुद्यांना पुन्हा हात घालू शकतात, पण लोकांना आता भावनिक नको विकासाचे मुद्दे हवे आहेत. लोकांचा कल बदलला हे नुकत्याच काही निवडणुकीतून दिसून आले. महाराष्ट्र राज्यात ज्या काही पोट निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. इतर काही राज्यात भाजपाच्या विरोधात जनमत आहे. कुस्ती दोन मल्लात होत असते. त्यात एका मल्लाचा पराभव होतो, पण पराभव होत असतांना पराभूत झालेल्या मल्लाचा चिवटपणा आठवणीत राहण्यासारखा असतो. तसाच प्रकार राजकारणात सुध्दा होत असतो. काँग्रेसचे बुरे दिन आहे, मात्र येत्या निवडणुकीत कॉग्रेस तितक्याच तीव्रतेने निवडणुकीचे मैदान गाजवणार हे दिसून येवू लागलं. काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. भारत जोडो यात्रेत राहूल यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. पाच हजार किलो मीटर पायी चालणं हे सोपं काम काही. राहूल यांची यात्रा कशी बदनाम करता येईल याचे सगळे प्रयत्न भाजपाने केले. त्यांना राहूल यांना बदनाम करता आलं नाही. अगदी चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्या पर्यंत भाजपाच्या कार्यकत्यार्ंंची मजल गेली होती. त्याला सुध्दा राहूल घाबरले नाही. राहूल यांची यात्रा यशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या दिशेने विरोधी बाण सोडणे सुरुच ठेवले. आदाणी आणि मोदी यांचे काय संबंध आहेत हा मुद्दा त्यांनी उचलून धरला. आदानी प्रकरणी भाजपाला बोलायला तोंडच नाही. अदानीवर भाजपाने काहीच भाष्य केलं नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदानी प्रकरण उचलून धरण्यात आले. त्याला तितका प्रतिसाद सत्ताधार्यांनी दिला नाही. उलट सत्ताधार्यांनी गोंधळ घालून अधिवेशन आटोपत घेतलं. अदानी प्रकरणी आपलीच नाचक्की होत आहे हे भाजपाच्या लक्षात आल्यानंतर हा विषय बाजुला सारण्यासाठी राहूल यांच्यावर कारवाई केली गेली? राहूल यांना राजकारणातून बाजूला काढण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. 2024 ची निवडणुक एकतर्फीच व्हावी अशी व्युहरचना भाजपा आखू लागला. राहूल यांच्यावर झालेल्या कारवाईचा भाजपाला तोटा आणि काँग्रेसला फायदा होवू शकतो? काँग्रेसला चांगली संधी साधून आली आहे. त्या संधीचं काँग्रेस कशा पध्दतीने सोनं करतंयं हे येत्या काळात दिसून येईल. काँग्रेसला पुन्हा उभारी येत आहे? त्यात राहूूल गांधी यांना पसंदी मिळू लागली हे बदल्या राजकारणाचं चित्र म्हणावं लागेल. भाजपाला राहूल गांधी यांची भीती वाटू लागली हे आता नक्की झालं आहे! कारण मुद्दयाची लढाई पुर्णंत: गुद्दयावर आली आहे, हे काही चांगलं लक्षण नाही.