Friday, October 22, 2021
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- कुठली रणनीती ठरणार? एकत्र आणि स्वतंत्र

प्रखर- कुठली रणनीती ठरणार? एकत्र आणि स्वतंत्र


महाराष्ट्रातील घडणार्‍या राजकीय घडामोडीकडे देशाचं लक्ष लागून असतं. राज्यात कुठं काही झालं की, सगळ्यांचेच डोळे लागून असते. मध्यंतरी खा. शरद पवार यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. फडणवीस हे भाजपाचे विरोधी पक्षनेते आहेत. फडणवीस पवारांना भेटल्याने काही होणार का? राज्यातील सत्तास्थान हालणार का? यासह अन्य वावड्या उठल्या होत्या. दोन नेत्यांतील चर्चा अनेक विषयावर झाल्याच असतील. पवारांचे आणि पंतप्रधान मोदी यांचे चांगले संबंध आहेत. तशी कबुली मोदी यांनी दिलेली आहे. राजकारणात अशा भेटी-गाठी होत असतात. राज्यात तीन पक्षाचं सरकार असल्याने हे सरकार पडेल असं भाकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमीच करत असतात, पण त्याचं हे भाकीत अजुन तरी खरं झालं नाही. भविष्यात होईल असं वाटत नाही. तीन विचाराच्या तीन पक्षांनी सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन करतांना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपसात तडजोडी करुनच सरकार स्थापन केलं असेल? पटत नसेल तर सरकार पाडणं हे तिन्ही पक्षांना परवडणारं नाही. राष्ट्रवादी, शिवसेनेत कटुता नसली तरी कॉंग्रेस पक्षाचे काही नेते नेहमीच फटकून बोलत असतात. कॉंग्रेस पक्षाला सरकारमध्ये राहणं हिताचं आहे हे त्या पक्षाला ही माहित आहे. एक तर कॉंग्रेसचं दिल्लीपासून ते गल्लीत पर्यंत पुरता बोर्‍या वाजलेला आहे. महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यातील सत्तेतील भागीदार संपुष्टात आणुन कॉंग्रेस पक्ष स्वत;च्या पायावर धोंडा मारुन घेईल असं वाटत नाही.


लोकप्रियतेला घरघर
देशातील राजकारणात आता पर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत. ज्यांची खासदारांची अगदी कमी सदस्य संख्या होती, अशा पक्षाला देशाची सत्ता मिळाली. देेवेगौडा, चंद्रशेखर यासारखे जनता दलाचे नेते पंतप्रधान होवू शकले. २००४ नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांना अनेक घटक पक्षांचे समर्थन होते. २०१४ साली भाजपाने घटक पक्षांना सोबत घेतले असले तरी त्यांनी सत्तेत आल्यानंतर घटक पक्षांना तितकं महत्व दिलं नाही. कारण भाजपाकडे बहुमत होतं. ज्यावेळी सदस्य संख्या कमी असते, त्यावेळी घटक पक्षाला जास्त महत्व ्रप्राप्त होत असतं. भाजपाने दोन्ही निवडणुकीत घटक पक्षांना थोडं लांब ठेवण्याचं काम केलं. मोदी यांची दुसरी टर्म तितकी चांगली ठरत नाही. मोदी यांचे चुकीचे धोरणं, इंधाची दरवाढ, देशाची अर्थव्यवस्था तळागळाला गेली, रोजगार नाही. कोरोनाचा हाहाकार यासह अनेक मुद्दे आ वासून उभे आहेत. पंतप्रधान मोदी ज्या प्रमाणे २०१४ साली पॉवरफुल होते, आता त्यांची तितकी लोकप्रियता राहिली नाही. आता येणार्‍या लोकसभा निवडणुकीची बांधणी सुरु असून त्या बाबत आता पासूनच चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यात भाजपाला खुप काही यश मिळालं नाही. ज्या पश्‍चिम बंगालवर भाजपाने पुर्णं ताकद लावली होती ते राज्य काही हाती आलं नाही. कॉंग्रेसपेक्षा घटक पक्ष भाजपाला चांगली टक्कर देवू शकतात हे समोर आलं. ममता यांनी एकटीच्या हिंमतीवर संपुर्ण भाजपाला हारवलं ही काही सोपी गोेष्ट नाही. ज्या प्रमाणे ममता यांची राष्ट्रीय राजकारणात चर्चा होत आहे. त्याच प्रमाणे खा. पवारांची ही चर्चा होत आहे. पवार हे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असले तरी तशी संधी आज पर्यंत त्यांना साधून आलेली नाही. संधी साधून आली तर नक्कीच देशाच्या राजकारणात बदल घडू शकतात.


राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र?

दोन भिन्न विचाराचे पक्ष एकत्रीत येतील असं वाटलं नव्हतं. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं हे राज्यात स्थापन झालेल्या तीन पक्षाच्या सत्तेवरुन दिसून आलं. स्व. इंदिरा गांधी यांना आणीबाणीच्या कार्यकाळात सर्वच पक्षाचा कडाडून विरोध होत. मात्र महाराष्ट्रात शिवसेना इंदिरा गांधी यांच्या पाठीशी उभी होती. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेस यांचं जुनं नातं आहे हे इतिहासात डोकावून पाहितल्यानंतर दिसून येतं. सध्या कॉंग्रेस पक्ष शिवसेनेसोबत आहे, याचं आश्‍चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. तीन पक्षाचं सरकार स्थापन करण्याची किमया खा. शरद पवार यांची आहे. येत्या काही महिन्यात महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुका आघाडी करुन की, स्वतंत्र लढवल्या जाणार याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा १० जुन रोजी २२ वा वर्धापन दिन झाला. या निमित्ताने खा. पवारांनी राज्यातील महाआघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असं सांगितलं. सरकारला कसलाही धोका नाही असं पवारांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या बाबतीत ज्या काही अफवा पसरवल्या जात होत्या. त्या अफवांची हवाच पवारांनी काढून घेतली. विशेष म्हणजे येणार्‍या निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रीत लढणार असल्याची घोषणाही पवारांनी केल्याने बरीच राजकीय समीकरणं बदलू शकतात. दोन्ही पक्ष एकत्रीत आल्यास याचा फटका भाजपाला बसू शकतो? शिवसेना आपल्याला सोडणार नाही आणि राष्ट्रवादी,कॉंग्रेस सोबत कधीच जाणार नाही असा जो काही अतिआत्मविश्‍वास भाजपाला होता ते पुर्णंता चुकीचा ठरला. राज्यात तीन पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपाच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. सत्ता गेल्याची सल भाजपाला आजही आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच एक वक्तव्य केलं. फडणवीस हे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद घेण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता ही तडजोड होणं शक्य नाही. जी वेळ होती जडजोडीची त्यात भाजपाने मागे हाटण्यास नकार दिला. वेळ गेल्यानंतर पश्‍चाताप करण्याशिवाय गत्यंतर नाही. गत वेळी शिवसेना भाजपासोबत एकत्रीत लढली होती. आता शिवसेना, राष्ट्रवादी सोबत लढत आहे. त्यामुळे सत्तेची शिडी कायम ठेवण्याचा विचार दोन्ही पक्षांचा असल्याचे यातून दिसून येते.


कॉंग्रेस एकली चालली!
राज्यातील कॉंग्रेस पक्षात जान आणण्यासाठी नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कॉंग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी होता आलं ते भाजपा-शिवसेना यांच्यातील भांडणामुळे, नाही तर कॉंग्रेस पक्षांची अवस्था वाईट झाली असती. राज्यात कॉंग्रेसचे बडे-बडे नेते असले तरी ते आपल्याच मतदार संघात बेजार असतात. कॉंग्रेसने अनेक वर्ष सत्ता भोगली. आता स्वबळावर सत्ता येणं ही कॉंग्रेसाठी मोठी अवघड बाब आहे. देशात ज्या काही निवडणुका होतात. त्यात कॉंग्रेसला यश मिळत नाही. कॉंगे्रसला नवीन कार्यकर्ता जोडला जात नसल्यामुळे कॉंग्रेस पक्ष वाढत नाही. कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी असली तरी कॉंग्रेस पक्षाने येणार्‍या निवडणुका एकत्रीत लढण्यास नकार दिला. नाना पटोले यांनी आताच घोषणा केली की, उद्या म्हणु नये आमच्या पोटात खंजीर खुपला. आम्ही आता पासून वेगळं लढण्याचा विचार करत असून आमची आगामी काळातील रणनिती ठरवणं सुरु आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तीन्ही पक्ष एकत्रीत लढणार नाही हे पटोले यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कोणासोबत जायचं आणि कोणाला विरोध करायचा हा ज्याचा-त्याचा वैयक्तीक प्रश्‍न आहे. कॉंग्रेसने राज्यात १९९९ पासून ते आज पर्यंत अनेक वेळा स्वतंत्र निवडणुका लढवल्या. त्यात विशेष काही यश मिळालं नाही. आघाडी करुनच कॉंग्रेस फायद्यात राहिली. जेव्हा पासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला, तेव्हा पासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रीत येवून राज्यात सत्ता भोगली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचा फायदाच झालेला आहे. प्रत्येक निवडणुकीत राजकीय गणीतं बदलतात. गत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचं अस्तित्व राहतं की, नाही याचीच चिंता वाटत होती, पण सोबत राष्ट्रवादी होती, त्यामुळे कॉंगे्रेसला आपली अब्रु वाचवता आली. आता पुन्हा कॉंग्रेसने स्वतंत्र निशान फडकवण्याची घोषणा केली. यात नेमकं काय होतयं हे येणार्‍या काळात समोर येईलच.

घटक पक्षांनी जोर लावला तर?
निवडणुका जिंकण्यासाठी सगळेच पक्ष वेगवेगळे तंत्र अवलंब करीत असतात. त्यासाठी पक्षाचे नेते अनेक हातखंडे वापरत असतात. भाजपाने २०१४ साली लोकसभा निवडणकुीत ज्या काही रणनितीचा अवलंब केला होता. त्यांची ती रणनिती कामी आली आणि भाजपा सत्तेच्या स्थानी पोहचला. काही पक्ष निवडणुकीच्या आधी जनमताची चाचणी करुन जनतेचा कौल कोणाकडे आहे याची पाहणी करत असतात. त्यासाठी त्यांची वेगळी यंत्रणा असते. भाजपा प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे हातखंडे वापरुन जनतेला आपलं करण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं नाव देशात चर्चेत आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपाला राजकारणाच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केलं होतं, तेव्हा पासून ते चर्चेत आले. शिवसेनेची त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळ भेट घेतली होती. नुकत्यात झालेल्या पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. भुषण आता पर्यंत ज्यांना-ज्यांना भेटले त्यांनी ज्या काही कानगोष्टी सांगितल्या त्या सत्यात उतरल्या असाव्यात म्हणुन भाजपा असेल, शिवसेना, तृणमुल कॉंग्रेस हे सत्तेत आले आहेत असं सांगितलं जातं. आता याच प्रशांत भुषण यांनी महाराष्ट्राचे राजकीय चाणक्य खा. शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे भुषण पुन्हा चर्चेत आले. निवडणुकीची रणनीती ठरवण्याबाबत त्यांचा चांगला अभ्यास आहे. देशात २०२४ च्या निवडणुकीची चर्चा सुरु आहेे. मोदींना पर्याय देण्यासाठी काही घटक पक्ष रणनिती ठरवू लागले. घटक पक्ष एकत्रीत आले तर परिवर्तन होवू शकतं? सत्ता कोणाची ही असली तरी ती जास्त काळ टिकून राहत नसते. सत्तेचा कुणी अमरपट्टा लावून आलेला नसतो. त्यात बदल होत असतात. २०२४ ला मोदी यांच्या सत्तेला दहा वर्ष पुर्ण होतील. दहा वर्षाचा कार्यकाळ म्हणजे बराच मोठा पल्ला आहे. या दहा वर्षात प्रचंड बदल झालेला आहे. दिवसे-दिवस राजकारणात, विचारात ही बदल होत असतात. तोच-तो चेहरा लोकांना तितका भावत नसतो. त्यामुळे बदलाची नांदी ही ठरलेली असते. येत्या निवडणुकीत देशातील घटक पक्षांनी जर चांगला जोर लावला, प्रत्येकांनी आपलं राज्य राखलं तर नक्कीच परिवर्तन होवू शकतं, पण घटक पक्ष एक जीवाने एकत्रीत आले पाहिजे हे ही तितकचं महत्वाचं आहे. त्यासाठी रणनिती आखणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!