पोराचा खूनच झाला -नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ, पोलीसांकडून चार संशयित ताब्यात
गेवराई (रिपोर्टर)- काल सायंकाळी घराबाहेर पडलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी एका धाब्याच्या शेजारी पडल्याची माहिती तरुणाच्या नातेवाईकांना झाली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तत्पूर्वी त्याच्या मित्राने त्याचा मृतदेह अगोदर खासगी रुग्णालयात व नंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला. रुग्णालयात मयत तरुणाचे नातेवाईक आले तेव्हा सदरील मृतदेह पाहून आक्रोश करत आमच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे, दोषींना तात्काळ अटक करा, म्हणत शवविच्छेदन रोखले. तब्बल दोन ते तीन तास प्रचंड गोंधळ रुग्णालयामध्ये पहायला मिळाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत रुग्णालयात दाखल करणार्या एका तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले तर अन्य तीन संशयितांना दोन तासांमध्ये शोधून चौकशी सुरू केली. सदरचा मयत तरुण हा तलवाडा पोईतांडा येथील आहे. प्रथमदर्शी सदरील तरुणाची हत्या झाली असावी, असा कयास काढला जात आहे.
याबाबत अधिक असेकी, गेवराई तालुक्यातील पोईतांडा येथील रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड (वय 18) या तरुणास काल सायंकाळच्या दरम्यान त्याच्या मित्रांनी भ्रमणध्वनीवरून जेवणासाठी धाब्यावर बोलवले होते. अशी माहिती नातेवाईकांकडून येत आहे मात्र आज सकाळी या तरुणाचा मृतदेह तलवाडा परिसरातील मेघदुत हॉटेलच्या आजुबाजुस पडल्याची माहिती नातेवाईकांना झाली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत त्याच्या दोन मित्रांनी रामेश्वरचा मृतदेह गेवराईतील खासगी रुग्णालयात नेला. त्यावेळी डॉक्टरांनी तो मृतद असल्याचे सांगितले. त्यामुळे एक तरुण घटनास्थळावरून पसार झाला मात्र दुसर्या तरुणाने अॅम्ब्युलन्समधून रामेश्वरचे शव
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणले. तोपर्यंत नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली. रामेश्वरचे शव पाहिल्यानंतर त्याच्या अंगावर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे नातेवाईकांनी संतप्त होत मारेकर्यांना तात्काळ अटक करा, म्हणत शवविच्छेदन रोखले. संतप्त नातेवाईकांनी आक्रोश करायला सुरूवायत केल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ रामेश्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याचबरोबर अन्य तिघांचा तात्काळ शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. रामेश्वरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी प्रथमदर्शी रामेश्वरची हत्या झाली असावी, असा कयास काढला जात आहे. कत्या दिशेने तलवाडा पोलीस तपास करत आहेत. मयताच्या नातेवाईकाची आक्रमकता पाहता त्यांचे जवाब आणि फिर्याद घेणे सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत रामेश्वरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते.