न.प.ने कंत्राटदाराला पैसे दिले मात्र कंत्राटदाराने कामगारांना दिले नाही
बीड (रिपोर्टर) बीड नगरपालिके अंतर्गत काम करणार्या स्वच्छता कामगारांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार केला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज संतप्त महिला कामगारांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत पालिका कार्यालयाचे गेट बंद केले होते. यामुळे कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. सदरील हे कामगार एका एजन्सीमार्फत काम करत आहेत, मात्र एजन्सी मालक गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याचे सांगण्यात येते.
बीड शहरांतर्गत साफसफाई करण्यासाठी अनेक कामगार आहेत. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साफसफाईचे कंत्राट मुंबई येथील अशोका एजन्सीला देण्यात आलेले आहे. एजन्सीमार्फत या कामगारांचा पगार केला जातो. एजन्सीने गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचा पगार केला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आज संतप्त महिला कामगारांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी कार्यालयाचे समोरील गेट बंद केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. कामगारांनी एजन्सीच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. न.प. प्रशासनाने सदरील एजन्सी मालकाला धारेवर धरत कामगारांचा पगार देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
न.प.ने एजन्सीला पगाराचे
पैसे दिले -सीओ अंधारे
स्वच्छता विभागातील कामगार हे एजन्सीमार्फत काम करत आहेत. या एजन्सीला नगरपालिकेने पैसे दिलेले आहेत. मात्र एजन्सीने त्यांचा पगार केलेला नाही. यापुर्वीचा पगारही न.प. प्रशासनाने नियमितपणे काढला असल्याचे न.प.च्या सीओ नीता अंधारे यांनी म्हटले आहे.