शिरूरमध्ये पोलीस कर्मचार्याने पाच हजार रुपयाची लाच मागितली; गुन्हा दाखल
शिरूर (रिपोर्टर): अदखलपात्र गुन्ह्यात मदत करतो, म्हणत येथील जमादाराने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र तडजोडअंती पाच हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने कबूल केले अन् तक्रारदार थेट लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला. त्याच्या तक्रारीवरून आज शिरूर पोलीस ठाणे याठिकाणी लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी, कर्मचार्यांनी सापळा रचला असता पोलीस ठाण्यात जमादार असलेले लाचखोर शिवाजी श्रीराम सानप यास पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर शिरूर पोलिसांसह तालुक्यातील अन्य कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपूर्वी वडवणी पोलिसात एका लाचखोर हवालदाराला रंगेहात पकडण्यात आले होते. पोलीस मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करत असल्याचे यावरून निष्पन्न होऊ लागले आहे.
याबाबत अधिक असे की, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणार्या तक्रारदारांचा मुलगा, पुतण्या व सुन यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करून संबंधित प्रकरणात कारवाईमध्ये जामीन करायला दहा हजार रुपये मागितले होते. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिल्यानंतर काल 16 जून रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली. या वेळी दहा हजाराची लाच मागितल्यानंतर 5 हजारावर तडजोड झाली. त्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरूर पोलिसात आज सकाळी सापळा रचला. या प्रकरणी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे संदीप आटोळे, विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे डीवायएसपी शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, उगले यांनी केली. दोनच दिवसांपूर्वी वडवणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याने दहा हजाराची लाच घेतली होती. त्याला लाचलूचपत पथकाने रंगेहात पकडल्यानंतर या प्रकरणात ठाणेप्रमुख कांगुणे यांचीही डीवायएसपींमार्फत चौकशी सुरू आहे.