बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हिंगणवाडी येथे गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक श्वेता खाडे यांना मिळाली होती. त्यांनी स्वत: आपल्या पथकासह तेथे धाड मारली असता तेथे 4 लाख 33 हजार 500 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करत एकाला ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. परराज्यातून गुटखा सहज बीडमध्ये येतो आणि त्याची विल्हेवाटही लागते. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणवाडी येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक केली होती. याची माहिती काल उपअधिक्षक खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ आपल्या पथकासह तेथे धाड टाकली. या वेळी 1 लाख 44 हजाराचा हिरा पान मसाला, 1 लाख 95 हजार रुपयांचा बाबा कंपनीचा पान मसाला, 58 हजार 500 रुपयांचा रॉयल तंबाखू, 36 हजाराचा रॉयल 717 तंबाखू, असा एकूण 4 लाख 33 हजार 500 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करत भागवत मोहनराव कदम (वय 25 वर्षे, रा. हिंगणवाडी ता. माजलगाव) व सचीन थळकर (रा. माजलगाव कॅम्प) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. भागवत कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर सचीन थळकर फरार झाला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक खाडे, सपो.नि. खटकळ, विजयसिंह जोनवाल आणि त्यांच्या टिमने केली.